मुंबई– ‘वाहन चालवताना सीट बेल्ट लावा अन्यथा अपघात होऊ शकतो..’ असा सल्ला एका दांपत्याला वाहतूक पोलिसाने दिला आणि अवघ्या १५ मिनिटात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. मात्र वाहतूक पोलिसाच्या सल्ल्यानंतर दांपत्याने सीट बेल्ट लावल्याने अपघातातून ते दोघेही आश्चर्यकारकरित्या वाचले आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता अंधेरी पूर्वेच्या उड्डाणपूलाजवळ हा अपघात घडला. सीट बेल्ट लावायचा सल्ला देणारा वाहतूक पोलीस या दांपत्यासाठी ‘देवदूत’ ठरला आहे.
गौतम रोहरा (४४) आणि त्यांच्या पत्नी छाया रोहरा (४२) हे गोरेगावला राहतात. दोघेही उच्चपदस्थ असून खासगी कंपनीत काम करतात. ते शनिवार २६ जुलै रोजी कामानिमित्ताने देवनार येथे आपल्या वाहनाने गेले होते. संध्याकाळी काम संपवून ते गोरेगाव येथील आपल्या घरी परतत होते. छाया रोहरा यांनी सीटबेल्ट लावला नव्हता. त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. सायंकाळी ४ च्या सुमारास त्यांना वांंद्र्याच्या कलानगर येथे वाहतूक पोलीस प्रवीण क्षीरसागर (३५) यांनी अडवले.
पाऊस पडत असल्याने क्षीरसागर यांनी गौतम रोहरा यांना आडोशाला बोलावून घेतले. सीट बेल्ट लावला नसल्याचे त्यांच्या निर्दशनास आणून देत यासाठी १ हजार रुपयांचा दंडात्मक कारवाई होते असे सांगितले. रोहरा दांपत्य सुशिक्षित होते. ते दंड भरायला तयार झाले. मात्र क्षीरसागर यांनी रोहरा दांपत्याला दंड न करता सीटबेल्टचे महत्व समजावून सांगितले. सीटबेल्ट हा वाहनचालक आणि वाहनातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असतो. अपघात घडल्यास सीटबेल्ट मुळे संरक्षण होते असे क्षीरसागर यांनी सांगितले. त्यानंतर रोहरा यांच्या पत्नीने सीट बेल्ट लावला आणि पोलिसांचे आभार मानून ते पुढे निघाले..
अवघ्या १५ मिनिटात अपघात..
अंधेरी उड्डाणपूलावरून खाली उतरताच रोहरा यांच्या गाडीने (बलेनो एमएच ०१- सीटी १५१६) दुभाजकाला धडक दिली. यामुळे वेगात असेलली रोहरा यांची गाडी दोन वेळा उलटली. मात्र रोहरा दांपत्य या अपघातामधून आश्चर्यकारकरित्या बचावले. गौतम रोहरा यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्या पत्नी छाया यांना खरचटलेही नाही. त्यावेळी तेथे असलेल्या एका पोलिसाने रोहरा दांपत्याला रिक्षात बसवून रुग्णालयात पाठवले. गाडीत असलेले रोहरा दांपत्याचे सामान, मोबाईल आदी मौल्यवान वस्तू त्या पोलिसाने आपल्या ताब्यात सुरक्षित घेतल्या होत्या. वेगात असलेले वाहन उलटूनही रोहरा दांपत्य सुखरूप राहिले त्याबाबत डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केले.
पोलीस ठरले देवदूत…
वाहतूक पोलीस प्रवीण क्षीरसागर यांनी वेळीच सावध केल्यामुळे रोहरा दांपत्य अपघातातून वाचले होते. त्यांचे आभार मानण्यासाठी रोहरा दांपत्य वाहतूक पोलीस क्षीरसागर यांचा शोध घेत बीकेसी वाहतूक पोलीस चौकीत पोहोचले. तुम्ही आमच्यासाठी देवदूत ठरलात असे सांगत आभार मानले. क्षीरसागर यांनी आम्हाला सीटबेल्ट लावायला सांगितला त्यामुळेच आम्ही जिवंत आहोत. त्यांचे ऋण आयुष्यभर विसरू शकत नाही अशा शब्दात गौतम रोहरा यांनी आपला कृतज्ञता व्यक्त केली. ते आमच्यासाठी देवदूत ठरले आहेत, असेही ते म्हणाले. आमचे पोलीस केवळ कारवाई करत नाहीत तर समाजप्रबोधनाचेही काम करतात. क्षीरसागर यांचा वरिष्ठांच्या हस्ते सत्कार केला जाईल, असे बीकेसी वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शिंदे यांनी सांगितले.