मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत ३ आणि ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी मंगळवार, २७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावरून जाहीर होणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि हमीपत्र अर्जासह शुल्क भरून प्रवेश निश्चिती २८ मे ते ३० मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत या कालावधीत होणार आहे.
मुंबई विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत प्रथम वर्ष विविध पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ८ मे ते २६ मे या कालावधीत प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत एकूण २ लाख ५३ हजार ३७० विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी केली. या सर्व विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ११ हजार ६४३ एवढे अर्ज सादर केले. विद्यापीठाने निर्गमित केलेल्या वेळापत्रकानुसार व प्रचलित नियमानुसार ही प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांमार्फत राबविली जात आहे.
पारंपरिक अभ्यासक्रमांसह स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना पसंती
विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक १ लाख ५१ हजार ९०२ अर्ज बी.कॉम अभ्यासक्रमासाठी दाखल करण्यात आले आहेत. तसेच बी.कॉम. (मॅनेजमेंट स्टडीज) ५४ हजार २३८, बी.कॉम. (अकाऊंट अँड फायनान्स) १ लाख १३ हजार ३९२, बी.ए. अभ्यासक्रमासाठी ८३ हजार ६३०, बी.एस्सी. माहिती तंत्रज्ञान ८६ हजार ९७६, बी.एस्सी. ३४ हजार ९८७, बी.एस्सी. संगणकशास्त्र ६७ हजार ४२३, बीएएमएमसी २६ हजार ४१६, बी.कॉम. (बँकींग अँड इन्शुरन्स ) २२ हजार २००, बी.कॉम. (फायनान्शिअल मार्केट) २८ हजार ४२३, बी.एस्सी. (जैवतंत्रज्ञान) २२ हजार ५७८, बी.एस्सी. (विदाशास्त्र) १५ हजार २३०, बी.एस्सी. (विदाशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता) ७ हजार १६३, बी.एस्सी. (कृत्रिम बुद्धिमत्ता) ६ हजार १२०, बी.एस्सी. (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग) ७ हजार ३५७, क्लाऊड टेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी १ हजार ६५ अर्ज दाखल झाले आहेत. यंदाही पारंपारिक अभ्यासक्रमांसह स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची विशेष पसंती पाहायला मिळत आहे.