मुंबई : सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सर्व देयके सहा महिन्यांत अदा करण्याचे शासन अध्यादेशात नमूद असतानाही संबंधितांचे निवृत्ती वेतन आणि इतर देणी प्रलंबित असल्याचे मुंबई विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे निवृत्ती वेतनासह विविध मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने दिला आहे. तसेच यासंदर्भातील निवेदनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठातील शासन अनुदानित एकूण १२७ शिक्षकेत्तर कर्मचारी २०१७ पासून नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले. यापैकी १२ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे निधन झाले, तर काही शिक्षकेत्तर कर्मचारी आजारी आहेत. परिणामी, त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
‘मुंबई विद्यापीठाकडून संबंधित प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठविण्यात आला आहे. मात्र शासनाच्या संबंधित विभागाकडून वारंवार नवीन कागदपत्रांची मागणी करून प्रस्ताव परत पाठवण्यात येत आहे. त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विद्यापीठाकडून पुन्हा माहिती सादर करण्यात आली आहे. परंतु तरीही सदर विषय मार्गी लागलेला नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे, आमच्या बैठकाही सुरू आहेत. निवृत्ती वेतनासह सर्व मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल’, असा इशारा मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष नरेश वरेकर यांनी दिला आहे.