बहुसंख्य प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला; महाविद्यालयांत पदवी वर्गातील तासिका वाया

मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांच्या ऑनलाइन (ऑनस्क्रीन मूल्यांकन) उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाचा प्राध्यापकांवरील वाढत्या ताणाचा फटका आता पदवी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी आता प्राध्यापकांना महाविद्यालयांना दांडी मारून काम करण्याचे निर्देश बहुतांश प्राचार्याकडून देण्यात येत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम रेंगाळू लागला आहे. त्यातच पुढील सत्र परीक्षा तोंडावर आल्याने अभ्यास पूर्ण होणार कधी आणि परीक्षा द्यायची कशी अशा गोंधळात विद्यार्थी आहे. त्यामुळे निकाल लांबलेल्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयातील शिकत असलेल्या इतर विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे.

राज्यपालांनी दिलेली निकालाची अंतिम मुदत जसजशी जवळ येत आहे, तसतशी विद्यापीठाची ऑनलाइन उत्तरपत्रिका  तपासणीसाठीची धावपळ वाढत आहे. दिवसाला किमान ३० पेपर तपासावेत, अशा आशयाचे परिपत्रक नुकतेच विद्यापीठाने काढले आहे. या आदेशाचे पालन करताना प्राध्यापकांची चांगलीच दमछाक होत आहे. जास्तीत जास्त उत्तरपत्रिका तपासता याव्या यासाठी काही महाविद्यालयातील प्राध्यापकांना रजा दिली जात आहे. तसेच जवळच्या केंद्रीय मूल्यांकन केंद्रांवर (कॅप) प्राध्यापक पूर्ण वेळ मूल्यांकनासाठी जात असतील तर त्यांना कामासाठी घेतलेली रजा म्हणून महाविद्यालयातील कामामधून सूट देण्यात येईल, असे परिपत्रकच विद्यापीठाने काढले आहे. त्यामुळे एकप्रकारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान झाले तरी चालेल, परंतु उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला प्राधान्य द्या, असा संदेशच विद्यापीठाने दिला आहे.

प्राध्यापकांना प्राचार्याकडूनही पेपर तपासणीच्या कामाला अधिक वेळ देण्याचे आदेश मिळत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये दिवसभरात मोजक्याच तासिका घेतल्या जात आहेत. उत्तरपत्रिका तपासणीच्या कामामध्ये गुंतलेल्या प्राध्यापकांच्या तासिका इतर कनिष्ठ प्राध्यापकांकडून घेतल्या जात आहेत. मात्र, हा प्रकार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा आहे. प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अडकल्यामुळे काही महाविद्यालयांमध्ये तर पदवीच्या वर्गाना सुट्टयाच दिल्या जात आहेत.

आठवडाभरात दोन तासिका

मुंबई विद्यापीठामध्ये जवळपास सर्वच विभागांमधील प्राध्यापक परीक्षा भवनामध्येच उत्तरपत्रिका  तपासणीसाठी जात असल्याने असल्याने आठवडाभरात दोनच तासिका घेतल्या जात आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सत्र परीक्षा असणार आहे. त्यातच या अभ्यासक्रमांचा आवाका मोठा असल्याकारणाने असेच अजून काही दिवस सुरु राहिले तर आमच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याची वेळ येईल, अशी भीती दक्षिण मुंबईतील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांने व्यक्त केली.

दुपारची प्रात्यक्षिकेही बंद

मुंबईबाहेरील म्हणजे पालघर, चिपळूण, वेंगुर्ला, दापोली अशा अनेक ठिकाणी प्राध्यापकांना महाविद्यालयापासून २० ते ५० किमी अंतरावर असलेल्या ‘कॅप’ सेंटरवर उत्तरपत्रिका तपासणीसाठी जावे लागते. सकाळच्या वेळेत तासिका करून प्राध्यापकांना केंद्रांवर पोहचावे लागत असल्यामुळे दुपारच्या वेळेत असणारी प्रात्यक्षिके गेले काही दिवस होतच नसल्याचे प्राध्यापकांकडून सांगण्यात येत आहे. या ठिकाणी पर्यायी प्राध्यापकांची सोय नसल्यामुळे याचा भरुदड विद्यार्थ्यांना बसत असून पुढील सत्र परीक्षा जवळ आली तरी अभ्यासक्रमाची गती मंदावलेलीच आहे.

अभ्यासक्रम उरकण्याची घाई

सकाळच्या वेळेत महाविद्यालये सुरू नसल्यामुळे अनेक प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी दुपारनंतर येतात. त्यामुळे सकाळच्या वेळामध्ये सव्‍‌र्हरवर ताण कमी असल्याकारणाने लवकर उत्तरपत्रिका तपासून होतात, हे प्राध्यापकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे काही प्राध्यापक रजा काढून उत्तरपत्रिका तपासणीचे काम करत आहेत. वर्ग होत नसल्याने प्राध्यापकांना आता सुट्टीच्या दिवशीही तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार असल्याचे प्राध्यापकांकडून सांगितले जात आहे. किंवा पुरेशा वेळेअभावी या सत्राचा अभ्यासक्रम घाईगडबडीत उरकला जाण्याची शक्यता आहे.

निकालाच्या गोंधळाबाबत विद्यार्थी संघटनांचा प्रतिक्रिया

मुंबई विद्यापीठाने प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला जुंपल्यामुळे महाविद्यालयांमध्ये तासिका वेळेवर होत नाहीत. येत्या सप्टेंबरमध्ये पुढील सत्राच्या परीक्षा सुरू होतील. परंतु अभ्यासक्रमाची गती बघता विद्यार्थी या परीक्षांचा अभ्यास करू शकतील का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. .

अ‍ॅड. अमोल मातेले, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना

महाविद्यालयामध्ये तासिका न घेता केवळ उत्तरपत्रिका तपासणीवर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना प्राध्यापकांना विद्यापीठाकडून दिल्या जात आहेत. जे पूर्णपणे चुकीचे आहे.  याचा अर्थ एक चूक सुधारण्यासाठी विद्यापीठ अजून चुका करत आहे आणि हे कदापि मान्य केले जाणार नाही.

तपदी मुखोपाध्याय, अध्यक्ष एमफुक्टो

वर्षांच्या सुरुवातीलाच तासिका नसल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये जर गैरहजर राहायला लागली तर नंतरही ती महाविद्यालयामध्ये फिरकणार नाहीत, अशीच शक्यता जास्त आहे. याचा अंतिमत: परिणाम त्यांच्या अभ्यासावर होणार आहे.

सचिन बनसोडे, मुंबई अध्यक्ष, छात्रभारती संघटना