निकालपत्रक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची पायपीट; पत्र देऊन प्राचार्याचीही दमछाक

मुंबई विद्यापीठातील ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या घोळामुळे रखडलेले निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली. विद्यापीठातील ‘प्रभारीं’नी दिवसाला चार ते पाच अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर करण्याचा झपाटा लावला आणि लवकरात लवकर निकाल लाऊन स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा निर्धार केला. मात्र जाहीर झालेल्या निकालांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचे निकालच उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना परीक्षा विभाग ते महाविद्यालय आणि पुन्हा परीक्षा विभाग अशी पायपीट करावी लागत आहे. इतके करूनही त्यांना निकालासाठी तब्बल एक महिना वाट पाहावी लागणार आहे. यामुळे निकाल जाहीर होऊन उपयोग काय, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या निकाल घोळावर पडदा घालण्यासाठी प्रशासनाने एकापाठोपाठ एक निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली. मात्र बहुतांश विद्यार्थ्यांना अनुपस्थितीत दाखविण्यात आले आहे. याचे नेमके कारण विचारण्यासाठी विद्यार्थी परीक्षा विभागात गर्दी करतात. मात्र तेथे त्यांना तुम्ही ज्या केंद्रावर परीक्षा दिली तेथून हजेरीपत्रक घेऊन या असे सांगण्यात येते. तर काही विद्यार्थ्यांना तुमचे प्रथम वर्षांपासूनच्या गुणपत्रिका उपलब्ध नसल्यामुळे निकाल जाहीर करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. जर तुम्हाला निकाल हवा असेल तर तुम्ही ज्या महाविद्यालयात शिकला तेथील प्राचार्याच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन या. या पत्रात तुमच्या सर्व सत्रांच्या गुणांचा समावेश असणे बंधनकारक आहे. याचबरोबर सर्व गुणपत्रिकांच्या छायांकित प्रती असणेही बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. यामुळे आता महाविद्यालयांमध्ये प्राचार्याच्या दालनाबाहेर विद्यार्थी रांग लावून उभे आहेत. तेथे उभे राहिल्यानंतर पत्र मिळवून पुन्हा परीक्षा विभाग गाठण्याची धडपड विद्यार्थ्यांची सुरू आहे. इतकेच नव्हे तर एवढा द्राविडी प्राणायाम करून परीक्षा विभागात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांला आता तुमच्या आधीच्या सत्रांच्या गुणांचा तपशील अद्ययावत झाल्यानंतर तुमचा आत्ताचा निकाल दिला जाईल. मात्र ही प्रक्रिया होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी जाईल, असे परीक्षा विभागातील कर्मचारी सांगत आहेत. यामुळे निकाल जाहीर होऊन इतकी वणवण करूनही वेळेत निकालपत्र न मिळाल्यामुळे ज्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे ती संधीही हुकेल, अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे.

निकाल उपलब्ध झाला नाही म्हणून कोकणातील रत्नागिरीपासून अलिबाग अशा विविध ग्रामीण भागांतून विद्यार्थी परीक्षा विभागाकडे धाव घेत आहे. मात्र तेथील कर्मचारी केवळ चालढकल करत असून त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्यक्षात महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे गुण सादर केलेले आहेत. काही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या गुणपत्रिका तर विद्यापीठानेच दिलेल्या आहेत. असे असतानाही विद्यापीठाकडे गुण उपलब्ध नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. त्याचप्रमाणे परीक्षेचे हजेरीपत्रकही विद्यापीठाकडे सादर केलेले असते. यामुळे विद्यार्थ्यांना पळवण्यापेक्षा परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी थोडा शोध घेतल्यास हा सर्व तपशील मिळू शकतो अशी भावना एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी व्यक्त केली आहे.

मुंबई विद्यापीठाने शुक्रवारी चार परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. ८०९९ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन शुक्रवारी पूर्ण झाले असून अद्याप सुमारे ७० हजार उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बाकी आहे. २६३ प्राध्यापक मूल्यांकनासाठी हजर होते.

हजेरीपत्रक आणण्यासाठी आणि आधीच्या सत्रांच्या गुणपत्रिका आणण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण होत आहे याची मला कल्पना आहे. मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रकरण हे वेगळे असते. ते समजून घेऊन त्याच प्रकारे अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करत आहे. दरम्यान, हजेरीपत्रक आणि आधीच्या सत्रांच्या गुणपत्रिका मागवू नयेत अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. असे असतानाही जर हे प्रकार होत असतील तर यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांना निकाल पाहणे सुलभ व्हावे यासाठी एका रात्रीत नवे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून त्यावर निकालांची पीडीएफ प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल समजू शकणार आहेत.

अर्जुन घाटुळे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

तर विद्यापीठाचा सर्वच कारभार ‘प्रभारी’ मंडळींकडे सोपविण्यात आला आहे. यामुळे गोंधळ आखणीच वाढला आहे. विद्यापीठाकडे प्रत्येक विद्यार्थ्यांचा ‘पीआरएन’ असतो. तो क्रमांक दिल्यावर संबंधित विद्यार्थ्यांचा संपूर्ण तपशील येणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नाही. मग या ‘पीआरएन’चा उपयोग काय? येथील कर्मचारी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत आहेत. याची विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी.

प्रदीप सावंत, माजी अधिसभा सदस्य, युवासेना