मुंबई : बारावीच्या घटलेल्या निकालाचा परिणाम मुंबई विद्यापीठाच्या पहिल्याच प्रवेश यादीवर दिसू लागला असून पारंपरिक अभ्यासक्रमांचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) यंदा दोन ते चार टक्क्यांनी घटले आहेत. त्याचवेळी स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना यंदाही विद्याथ्यर्ांचा प्रतिसाद अधिक आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी मंगळवार, २७ मे रोजी संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावरून जाहीर झाली. यंदा स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) वाढ आणि पारंपारिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये मोठी घट झाल्याचे दिसते आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये स्वायत्त महाविद्यालयांसह विविध महाविद्यालयांनी नवनवीन स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल हा पारंपारिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांकडे वाढत असल्याचे दिसत आहे, याचा परिणाम प्रवेश पात्रता गुणांवरही झाला आहे. काही महाविद्यालयांच्या पारंपारिक अभ्यासक्रमांसह स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत चढ – उतार पाहायला मिळत आहेत. यंदा प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाकडे एकूण २ लाख ५३ हजार ३७० विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी केली. या सर्व विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ११ हजार ६४३ एवढे अर्ज सादर केले होते.

‘सध्या पारंपारिक अभ्यासक्रमाअंतर्गत भविष्यवेधी दृष्टिकोन ठेऊन नाविन्यपूर्ण स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल हा स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांकडे जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पारंपारिक अभ्यासक्रमांसाठी नोंदणीही कमी केली आहे, परिणामी पारंपारिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये घट झाली आहे. तर स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये वाढ झाली आहे’, असे सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

पुढील प्रवेश प्रक्रिया कशी?

पहिल्या गुणवत्ता यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि हमीपत्र अर्जासह शुल्क भरून प्रवेश निश्चिती २८ मे ते ३० मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत या कालावधीत होणार आहे.

मुंबईतील काही महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण

सेंट झेविअर्स महाविद्यालय, फोर्ट : बी.ए. अभ्यासक्रमासाठी ९०.०० टक्के (गतवर्षी ९२.३३ टक्के), बी.ए. मानसशास्त्र ९३.३३ टक्के (गतवर्षी ९१.८३ टक्के), बी. कॉम. अकाऊंट ॲण्ड फायनान्स ९२.१७ टक्के (गतवर्षी ९१.६७ टक्के) आणि बी.एस्सी.अभ्यासक्रमासाठी ६५.०० टक्के (गतवर्षी ६५.०० टक्के) इतके प्रवेश पात्रता गुण आहेत. तसेच बी.एस्सी. विदाशास्त्र व कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमासाठी ९५.०० टक्के, बी.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी व कम्प्युटेशनल बायोलॉजी अभ्यासक्रमासाठी ९१.६७ टक्के, बी.ए. अर्थशास्त्र व स्टॅटिस्टिक्स ८९.३३ टक्के, बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी ७६.३३ टक्के.

रुईया महाविद्यालय, माटुंगा : ‘बी.ए.’ इंग्रजी माध्यम अभ्यासक्रमासाठी ९०.०० टक्के (गतवर्षी ९२.०० टक्के) इतके प्रवेश पात्रता गुण असतील. यंदा बी.ए मराठी माध्यमाला प्रवेश घेण्यासाठी ४४.३३ टक्के (गतवर्षी ४५.०० टक्के), बी.ए. कम्युनिकेशन अँड मीडिया इंग्रजी माध्यम ९१.३३ टक्के (गतवर्षी ९३.०२ टक्के) व मराठी माध्यम ४४.३३ टक्के (गतवर्षी ४१.६७ टक्के), बी.एस्सी. ६०.०० टक्के (गतवर्षी ६९.३३ टक्के), बी.एस्स्सी – बायोटेक्नॉलॉजीसाठी ९४.६ टक्के (गतवर्षी ९२.०२ टक्के), बी.एस्स्सी – बायोकेमिस्ट्रीसाठी ६०.०० टक्के (गतवर्षी ७४.३३ टक्के), बी.एस्स्सी संगणकशास्त्रासाठी ८०.१७ टक्के (गतवर्षी ८२.१७ टक्के), बी.एस्स्सी बायोअनॅलिटीकल सायन्ससाठी ६१.५ टक्के (गतवर्षी ५०.६७ टक्के), तर ट्रॅव्हल अँड टुरिझम (टीटीएम) अभ्यासक्रमासाठी ४४.६७ टक्के.

रुपारेल महाविद्यालय, माटुंगा रोड (पश्चिम) : ‘बी.ए.’ अभ्यासक्रमासाठी ८७.३३ टक्के (गतवर्षी ८८.३३ टक्के), बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी ७७.३३ टक्के (गतवर्षी ८२.०५ टक्के), बी.एस्स्सी – संगणकशास्त्र अभ्यासक्रमासाठी ७२.६६ टक्के (गतवर्षी ७८.८३ टक्के), बी.एस्स्सी – माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी बारावीत गणित विषयात १०० पैकी ५३ गुण (गतवर्षी १०० पैकी ७० गुण) इतके प्रवेश पात्रता गुण आहेत. तर बी.एस्स्सी अभ्यासक्रमासाठी विषय गटानुसार सीपीएस ६०० पैकी २७७ गुण, सीपीएम व पीएमएस गटासाठी सर्व, सीपीबी २९० गुण, सीपीझेड २७३ गुण आणि सीबीझेड विषय गटासाठी ३१० गुण.

पोदार महाविद्यालय, माटुंगा : यंदा ‘बी.कॉम.’ अभ्यासक्रमासाठी ९४.३३ टक्के (गतवर्षी ९४.०० टक्के) इतके प्रवेश पात्रता गुण असतील. याशिवाय यंदा बी.कॉम – फायनान्शिअल मार्केट्ससाठी ९४.५ टक्के (गतवर्षी ९३.८३ टक्के), बी.एस्स्सी. – डाटा सायन्स अँड अनॅलिटीक्ससाठी ८१.०० टक्के (गतवर्षी ८६.०५ टक्के) इतके प्रवेश पात्रता गुण आहेत. तसेच बी.कॉम – अकाउंटिंग अँड फायनान्ससाठी ९५.६ टक्के, बी.कॉम – ऍक्च्युरिअल स्टडीजसाठी ८६.८३ टक्के.

साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले : ‘बी.ए.’ अभ्यासक्रमासाठी ५९ टक्के टक्के, बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी ७७.१७ टक्के, बी.एस्स्सी. अभ्यासक्रमासाठी ३८.०० टक्के इतके प्रवेश पात्रता गुण असतील. तसेच बी.एस्स्सी. आयटी अभ्यासक्रमासाठी इयत्ता बारावीत गणित विषयात १०० पैकी ६२ किंवा त्याहून अधिक गुण, बी.कॉम. मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी ७७.०८ टक्के – वाणिज्य शाखा, ४६.६७ टक्के – विज्ञान शाखा), ७०.०० टक्के – कला शाखा) आणि ५३ टक्के – पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी असतील. बीएएमएमसी – इंग्रजी माध्यम अभ्यासक्रमासाठी ४५.०० टक्के – वाणिज्य शाखा, ४६.०० टक्के – विज्ञान शाखा), ४५.०० टक्के – कला शाखा) आणि ४९ टक्के – पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी असतील. तसेच बीएएमएमसी – मराठी माध्यम अभ्यासक्रमासाठी ४६.०५ टक्के – वाणिज्य शाखा, ५४.०० टक्के – कला शाखा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले : बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी ६५.०० टक्के, बी.कॉम. मॅनेजमेंट स्टडीज ७३.३३ टक्के (वाणिज्य शाखा), ५२.८३ टक्के (विज्ञान शाखा), ६२.०० टक्के (कला शाखा), बी.कॉम. अकाउंट अँड फायनान्स ८१.०० टक्के, बँकिग अँड इन्शुरन्स ७४.०० टक्के, फायनान्शिअल मार्केट ७५.८३ टक्के, बिझनेस एडमिनिस्ट्रेशन ५१.५ टक्के, लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट ५०.०० टक्के, बी.एस्सी. माहिती तंत्रज्ञान गणित विषयात १०० पैकी ४२ गुण, विदाशास्त्र ६९.१६ टक्के, बी. ए. मानसशास्त्र ५७.५ टक्के, बीएएमएमसी ४७.८३ टक्के (कला शाखा), ४५.८३ टक्के (वाणिज्य शाखा) आणि ५१.३३ टक्के (विज्ञान शाखा).