मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, धरणक्षेत्रात शुक्रवारपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असून ८९ टक्क्यांवर स्थिरावलेल्या पाणीसाठा अखेर ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी याच दिवशी तो ९३.२३ टक्के होता. यंदा जूनमध्ये प्रचंड पाऊस कोसळूनही मागच्या काही दिवसांमध्ये पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे गतवर्षीच्या तुलनेत सध्या तीन टक्के पाणीसाठा कमी आहे.
मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी असून आता धरणांमध्ये १४ लाख ०४ हजार ९८१ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने मुंबईकरांची पाणीचिंता मिटली होती. यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठा ५०.७५ टक्क्यांवर पोहोचला होता. गतवर्षी तो केवळ ८.५९ टक्के होता.
जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणे ५० टक्के भरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दडी मारली. सातही धरणांमध्ये मिळून २६ जुलै रोजी ८८.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. २७ जुलै रोजी पाणीसाठ्यात वाढ होऊन तो ८९.७० टक्क्यांवर पोहोचला. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा ८८ टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर जवळपास सात दिवस हा पाणीसाठा ८८ टक्क्यांवरच स्थिरावला होता. ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस कोसळेल अशी मुंबईकरांना आशा होती. मात्र, प्रत्यक्षात पावसाने दडी मारली होती.
३ ऑगस्ट रोजी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठा ८९.०९ टक्क्यांवर पोहोचला. मात्र, त्यानंतर आतापर्यंत त्यात वाढ झालेली नाही. सुमारे दोन आठवड्यांपासून ८९ टक्क्यांवर स्थिरावलेला पाणीसाठा गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ९०.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी सकाळी ६ वाजताच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत सातही धरणांमध्ये ३२१ मिमी पाऊस कोसळला. सर्वाधिक म्हणजेच १३३ मिमी पाऊस तुळशी धरणात, तर १२० मिमी विहारमध्ये बरसला.
सद्यस्थितीत सातही धरणांमध्ये मिळून ९०.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ऊर्ध्व वैतरणामध्ये ८५.८२ टक्के, मोडकसागरमध्ये ८८.४९ टक्के, तानसामध्ये ९८.८ टक्के, मध्य वैतरणामध्ये ९६.२६ टक्के, भातसामध्ये ८८.६५ टक्के, विहारमध्ये ८७ टक्के, तुळशीमध्ये ९५.८८ टक्के पाणीसाठा आहे.