मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हवामान विभागाने पुढील दोन – तीन दिवसांनंतर मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईकरांना उन्हाचा ताप जाणवला. एकीकडे मुंबईत अधूनमधून पाऊस सुरू असताना उन्हाचा ताप आणि उकाडा सहन करावा लागत आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून फारसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. सध्या मुंबईतील तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. मात्र आर्द्रतेत वाढ झाली आहे. मागील दोन – तीन दिवसांपासून आर्द्रता ७५ ते ८० दरम्यान होती. वाढती आर्द्रता आणि मध्येच ढगाळ वातावरण तर मध्येच ऊन यामुळे उष्मा अधिक जाणवत आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या तापमानाचा पारा २७ ते ३० अंश सेल्सिअस इतका होता. त्यानंतर मागील दोन दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे तापमानाचा पारा चढा आहे. याचबरोबर समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा लागत आहेत. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३१.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, सध्या मुबंईत उत्तरेकडून कोरडे वारे वाहत आहेत. याचबरोबर मोसमी वारे सक्रिय नाहीत. त्यामुळे सध्या ही स्थिती निर्माण झाली असून गुरुवारपर्यंत वातावरण असेच राहील, त्यानंतर उन्हाचा ताप कमी होईल.

शनिवारपासून मुसळधार

मुंबईत शनिवारपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यानुसार या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. सलग दोन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांना वाहतूक कोंडी आणि इतर अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

आर्द्रतेचा परिणाम

आर्द्रतेमुळे शरीरातून घाम बाहेर पडतो, पण वाफेच्या स्वरुपात हवेत शोषून घेतला जात नाही. त्यामुळे शरीर थंड होत नाही आणि उष्णता अधिक जाणवते. घाम व उष्णतेमुळे निर्जलीकरणाचा धोका. दम लागणे, अशक्तपणा, त्वचेच्या त्रासांमध्ये वाढ.

मागील काही दिवसांत झालेला पाऊस (मिमीमध्ये)

कुलाबा

२० सप्टेंबर- १२.१ मिमी

२१ सप्टेंबर- १.६ मिमी

२२ सप्टेंबर- २० मिमी

२३ सप्टेंबर- २८ मिमी

२४ सप्टेंबर- शून्य मिमी

सांताक्रूझ

२० सप्टेंबर- ६१ मिमी

२१ सप्टेंबर- ८.४ मिमी

२२ सप्टेंबर- ३.५ मिमी

२३ सप्टेंबर – १७ मिमी

२४ सप्टेंबर- २.७ मिमी