मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी वाढली असून या प्रवाशांना रोखण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने या मोहिमेदरम्यान विनातिकीट प्रवाशांची धरपकड करून ७१ कोटी रुपये दंड वसूल केला असून ही रक्कम पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत जमा करण्यात आली.

पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल – जुलै २०२५ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या मोहिमांमध्ये ७०.९८ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच, गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत २०२५ मधील दंडवसुलीत २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. याबरोबरच रेल्वे मंडळाने ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा ११ टक्के जास्त दंड वसुली झाली आहे. मुंबई उपनगरीय विभागातून वसूल करण्यात आलेल्या १९.५५ कोटी रुपयांचा त्यात समावेश आहे. वातानुकूलित लोकलमधील विनातिकीट प्रवाशांना पकडून ९३ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

जुलैमध्ये विनातिकीट प्रवाशांची धरपकड

पश्चिम रेल्वेने जुलै २०२५ मध्ये वसूल केलेल्या दंडाच्या रकमेत लक्षणीय वाढ झाली आहे. तिकीट नसलेल्या/अनियमित २.२२ लाख प्रवाशांना शोधून १२.१९ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये आरक्षित न केलेल्या सामानाच्या प्रकरणाचा समावेश आहे. मागील वर्षीच्या जुलैच्या तुलनेत ती १३४ टक्क्यांनी अधिक आहे. यामध्ये मुंबई उपनगरीय विभागात सुमारे ९२ हजार प्रकरणे शोधून ३.६५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. वातानुकूलित लोकलमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी, वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात येत आहेत. वातानुकूलित लोकलमध्ये लक्ष केंद्रित केलेल्या मोहिमेमुळे एप्रिल – जुलै २०२५ या कालावधीत २८ हजारांहून अधिक अनधिकृत प्रवाशांवर दंडात्मक करवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ९३.४० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. गतवर्षी याच कालावधीच्या तुलनेत तो ५८ टक्के अधिक आहे.

पश्चिम रेल्वेचे म्हणणे काय ?

पश्चिम रेल्वेवरील सर्व तिकीटधारक प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास आणि चांगली सेवा देण्यासाठी मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल/एक्स्प्रेस, तसेच प्रवासी गाड्या आणि सुट्टीच्या विशेष रेल्वेगाड्यांमध्ये सतत तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहेत. जेणेकरून विनातिकीट प्रवाशांचा धोका कमी होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.

गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवाशांचा प्रवास

पश्चिम रेल्वेवरून दररोज १,४०६ लोकल फेऱ्या धावतात. या लोकल फेऱ्यांमधून सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करतात. तसेच पश्चिम रेल्वेवर सध्या १०९ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात. यामधून दररोज सुमारे १.२६ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीचा फायदा घेऊन अनेक विनातिकीट प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करतात. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.