एका महिलेने Blink it डिलिव्हरी बॉयने गैरवर्तन केल्याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. ब्लिंक इट च्या डिलिव्हरी बॉयने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यासंदर्भातला व्हिडीओ या महिलेने एक्सवर पोस्ट केला आहे. सदर डिलिव्हरी बॉयने छातीला स्पर्श केला असं या महिलेने म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणी ब्लिंक इटनेही दिलगिरी व्यक्त केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतल्या एका महिलेने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असा आरोप या महिलेने केला आहे. या महिलेने म्हटलं आहे की तो आला त्याने मला पार्सल दिलं त्यानंतर माझ्या छातीला स्पर्श केला. त्याने ब्लिंक इटचा गणवेश घातला होता. पार्सल देऊन पैसे घेत असताना त्याने हे गैरवर्तन केलं. तसंच आपण काही केलं नाही अशा बेमालुम पद्धतीने तो वागला. मी ब्लिंक इटवरुन ऑर्डर दिल्यानंतर मला हा घाणेरडा आणि किळसवाणा अनुभव आला. ही गोष्ट साफ चुकीची आहे. यावर ब्लिंक इटने बोललं पाहिजे असंही या महिलेने म्हटलं आहे. दरम्यान ब्लिंक इटने सदर प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
काय म्हटलं आहे ब्लिंक इटने?
महिलेने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर ब्लिंक इटने या घटनेची दखल घेतली आहे. आम्ही सदर डिलिव्हरी बॉयवर कारवाई करु असं आश्वासनही ब्लिंक इटने दिलं आहे. सुरुवातीला ब्लिंक इटने तिची तोंडी तक्रार फेटाळली होती. पण तिने जेव्हा व्हिडीओ पोस्ट केला तेव्हा ब्लिंक इटने कारवाईचं आश्वासन दिलं आणि सदर महिलेची माफी मागितली. इतकंच नाही तर सदर ब्लिंक इट ड्रायव्हरचं कंत्राटही रद्द केल्याचं ब्लिंक इटने म्हटलं आहे. जे घडलं त्या प्रकाराबाबत आम्ही दिलगीर आहोत. तुम्हीही तुम्हाला जी कारवाई करायची आहे ती करा असंही ब्लिंक इटने सांगितलं.
व्हायरल व्हिडीओबाबत प्रतिक्रिया
महिलेने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या महिलेची बाजू योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर काही युजर म्हणत आहेत की जे तुम्ही म्हणत आहात ते कदाचित चुकून झालं असू शकतं. त्यावरुन वाद सुरु झाला आहे. काही युजर्सनी म्हटलं आहे की त्या महिलेने संमती न घेता व्हिडीओ कसा काय रेकॉर्ड केला? तर काहींनी त्या ब्लिंक इट वाल्याचं चुकलं असंही म्हटलं आहे.