मुंबई– जोगेश्वरीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून वीट खाली पडून झालेल्या २२ वर्षीय तरुणीच्या मृत्यूप्रकरणी विकासक आणि ठेकेदाराविरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी जोगेश्वरीच्या मजासवाडी येथे बुधवारी सकाळी ही घटना घडली होती.

संस्कृती ही जोगेश्वरी पूर्वेच्या मजासवाडी येथे आई वडिलांसह रहात होती. तिच्या वडिलांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. संस्कृती हिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलेला असून. नुकतीच ती एका खासगी बॅंकेत कामाला लागली होती. सकाळी नेहमीप्रमाणे ती कामावर जाण्यासाठी निघाली होती.

मजासवाडीच्या धोबीघाट परिसरात श्रध्दा लाईफ स्टाईल एलएलपी या कंपनीतर्फे एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. संस्कृती त्याच इमारतीच्या खालून जात होती. त्यावेळी साडेनऊच्या सुमारास या इमारतीवरून सिमेंटची वीट (ब्लॉक) संस्कृतीच्या डोक्यावर पडली. ती बेशुध्द होऊन खाली पडली. तिला उपचारासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषीत केले. वीट डोक्यात पडल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे संस्कृतीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्हा दाखल

बांधकाम सुरू असताना सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र ते केल्याचे दिसून आले नाही. याबाबत मयत संस्कृतीचे वडील अनिल अमिन यांनी मेगवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी श्रध्दा लाईफ स्टाईल एलएलपी या कंपनीसी संबधिक विकासक, ठेकेदार, पर्यवेक्षक आदींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि ३ (५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रहिवाशांना बांधकामाचा त्रास

मागील ६ महिन्यांपासू ड्रिलिंगचे काम सुरू असून खडी उडून अनेकांना दुखापत झाली आहे. ५ दिवसांपूर्वी याच इमारतीमधून मोठा प्लायपडून जवळच्या घरांचे पत्रे तुटले होते. परंतु श्रध्दा लाईफस्टाईल एलएलपी कंपनीच्या विकासकाने पत्रे दुरूस्त करून दिल्याने कुणी तक्रार केली नव्हती.