मुंबई: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करा या मागणीसाठी युवक काँग्रेसकडून वर्षा बंगल्याबाहेर आंदोलन करण्यात आले. गिरगाव चौपाटी, नरिमन पॉइंट तसेच वर्षा बंगला अशा तीन ठिकाणी युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप व महायुती सरकारविरोधात घोषणा दिल्या. पोलिसांनी तिन्ही ठिकाणी आंदोलकांची धरपकड करून ताब्यात घेतले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर युवक काँगेसकडून वर्षा बंगल्याबाहेर आंदोलनाची हाक देण्यात आली. सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली. गिरगाव चौपाटी येथे आंदोलनाला सुरवात झाली. यावेळी वर्षा बंगल्याच्या दिशेने जाण्यास निघालेल्या काँग्रेस आंदोलकांना पोलिसांनी रोखले व त्यांची धरपकड करण्यात आली.
आक्रमक कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियमजवळ मरिन ड्रायव्हवरच रास्ता रोको केला, यामुळे जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी झाली. पोलिसांनी येथील कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तन्वीर अहमद विद्रोही, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रविणकुमार बिराजदार आणि नागपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेश कान्हेरे यांनी मात्र पोलिसांना गुंगारा देऊन वर्षा बंगल्याबाहेर आंदोलन केले व जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले.
डॉ. संपदा मुंडे यांना भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पोलिसांच्या अनन्वित छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असली तरी यामागचा मुख्य सुत्रधार भाजपाचा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर मात्र अद्याप मोकाटच आहे. मुख्यमंत्र्यांनी तर निंबाळकरांना कोणत्याही चौकशी आधीच क्लिन चिट देऊन टाकली आहे. काँग्रेस पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंडे कुटुंबीयांना दिली आहे.
सरकार चौकशीच्या नावाखाली मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण जोपर्यंत संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा हा लढा सुरूच राहणार असल्याचे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदन भानू चिब, युवक काँग्रेसचे प्रभारी मनीष शर्मा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
