मुंबई : गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात पूर्ववैमनस्यातून नाझिम कुरेशी (२६) याने अस्लम कुरेशी (३०) या तरुणाची गळा चिरून हत्या केली. ही घटना गजबजलेल्या जौहर शाळेच्या मैदानात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लम कुरेशी लोटस कॉलनीत पत्नी आणि दोन लहान मुलांसह राहत होता. तो बसमध्ये क्लिनर म्हणून काम करीत होता. त्याची बहीण आसमा कुरेशीच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार अस्लम नेहमी आपल्या बालमित्रांसह जौहर शाळेच्या मैदानात बसून गप्पा मारत असे. तीन वर्षांपूर्वी अस्लमचा धाकटा भाऊ हसीनवर वसीम आणि समीर या दोघांनी हल्ला केला होता. त्यावेळी हसीन थोडक्यात बचावला होता आणि त्या गुन्ह्यात पोलिसांनी वसीम व समीरला अटक केली होती.
२०२२ मध्ये घडलेल्या या घटनेनंतर वसीमचा धाकटा भाऊ नाझिम कुरेशी याच्या मनात कुरेशी कुटुंबाविषयी वैर निर्माण झाले होते. त्याने अनेकदा हल्ल्याचे कारस्थान रचल्याची माहिती कुटुंबिांनी पोलिसांना दिली आहे. सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास असलम आपल्या मित्रांसोबत मैदानात उभा असताना नाझिम अचानक पाठीमागून आला आणि चाकूने असलमच्या गळ्यावर वार करून पसार झाला.
गंभीर जखमी अवस्थेत असलमला मित्रांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी नाझिमला अटक केली असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.