बेशिस्तांच्या यादीत मुंबईकर आघाडीवर

एकदिशा मार्ग असलेल्या रस्त्यांवर विरुद्ध दिशेने वाहन चालविण्यास परवानगी नाही.

वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तब्बल ६९ हजार प्रकरणांची नोंद; ठाण्यातील वाहनचालकांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई
मुंबई : एक दिशा मार्ग किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याच्या प्रकारांमुळे मोठ्या संख्येने अपघात होण्याची भीती वर्तविण्यात येत असून दिवसेंदिवस वाहनचालकांमधील बेदरकारपणा वाढत असल्याचे समोर आले आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांच्या यादीत मुंबईकर आघाडीवरच असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. गेल्या दीड वर्षामध्ये वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या मुंबईतील तब्बल ६९ हजार वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यापाठोपाठ ठाणे, पुणे आणि नाशिकमध्येही विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

एकदिशा मार्ग असलेल्या रस्त्यांवर विरुद्ध दिशेने वाहन चालविण्यास परवानगी नाही. मात्र असे असतानाही अनेक जण विरुद्ध दिशेने भरधाव वेगात वाहन चालवून वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या वाहनचालकांविरोधात कारवाई करूनही अशा प्रकारांना आळा बसलेला नाही. अखेर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकारांची दखल घेतली आणि हा वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात जास्तीत जास्त दंडाची कारवाई करण्याची सूचना केली होती.

अशा प्रकारे वाहतुकीचे नियम मोडल्याच्या जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ ते जून २०२१ या कालावधीत दोन लाख ६४ हजार ३४७ प्रकरणांची नोंद झाली. या वाहनचालकांवर केलेल्या कारवाईतून २६ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केल्याची माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. राज्यात सर्वाधिक कारवाई मुंबईत होत असून २०२० मध्ये ३३ हजार २८२ आणि २०२१ मध्ये ३५ हजार ८९३ प्रकरणे झाली आहेत. ठाण्यातही गेल्या वर्षी २५ हजार ३९४ आणि या वर्षी १० हजार ९५३ वाहनचालक जाळ्यात अडकले आहेत. गेल्या वर्षीपासून नाशिक शहरातही अवघ्या ८११, तर नागपूर शहरात ५ हजार ४०० पेक्षा अधिक बेशिस्त वाहनचालक वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. विरुद्ध दिशेने वाहन हाकणाऱ्या चालकांवर एक हजार रुपये इतका दंड आकारला जातो.

द्रुतगती महामार्गावरही सर्रास उल्लंघन

मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर मनाई असतानाही विरुद्ध दिशेने धोकादायकरीत्या प्रवास केला जात आहे. या मार्गावर मोठया प्रमाणात अपघात होत असतात. त्यामुळे विरुद्ध दिशेने वाहन चालताना या मार्गावरही चालकांविरोधात कारवाईचा बडगा उचलला जात आहे. २०२० मध्ये ५४३ आणि २०२१ मध्ये ५५७ चालकांवर कारवाई के ली आहे. महामार्गालगत असलेल्या गावांतील ग्रामस्थांकडून अशी उलट वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbaikar list unruly violation of traffic rules akp