मुंबई : मुंबईच्या हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. तरीही मुंबईच्या काही भागात हवेचा दर्जा वाईटच आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शुक्रवारीही शिवाजीनगर येथील हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली गेली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळत आहे. बांधकामे, वाहनांमुळे होणारे वायूप्रदूषण यामुळे मागील दोन महिन्यांपासून हवेच्या प्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे मुंबई महापालिकेने काही भागात बांधकामांवर पूर्ण बंदी घातली आहे. तसेच कडक नियमावलीही लागू करण्यात आली आहे. वेगवेगळ्या पातळीवर करण्यात येणाऱ्या उपायांनंतरही हवेच्या दर्जात सुधारणा झालेली नाही. शिवाजीनगर, गोवंडी येथे शुक्रवारीही सायंकाळी हवे ‘वाईट’श्रेणीत नोंदली गेली. तेथील हवा गुणवत्ता निर्देशांक २१२ इतका होता. त्याचबरोबर नेव्ही नगर येथेही ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तेथे २६० इतका हवा निर्देशांक होता.

हेही वाचा…कमी दृश्यमानतेमुळे मासळीही दिसेनाशी; यंदाच्या वर्षी सरंगा, बोंबिलाच्या दरात ७० टक्क्यांनी वाढ

गोवंडी शिवाजीनगरमधील हवा मागील दोन महिन्यांपासून अनेकदा वाईट श्रेणीत नोंदली गेली आहे. तेथे पीएम २.५ धुलीकणांची मात्रा अधिक होती. दरम्यान, त्या परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. तसेच बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना न केल्याने हवेत धूळ पसरण्याचे प्रमाण या परिसरात अधिक आहे. राडारोड्याची अवैध वाहतूक, तसेच कचराभूमीमधील कचरा जाळण्याचे वाढते प्रमाण यामुळे सतत प्रदूषण वाढत आहे. यापूर्वीही अनेकदा शिवाजीनगरमधील हवेची वाईट ते अतिवाईट श्रेणीत नोंद झाली होती. आता पुन्हा तेथील हवा गुणवत्ता खालावल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. विविध उपाययोजना करूनही या परिसरातील हवेच्या गुणवत्तेत फरक पडलेला नाही. त्यामुळे शिवाजीनगर परिसरातील स्थानिकांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्याचा जास्त परिणाम वयोवृद्ध आणि लहान मुलांवर होत आहे.

मागील दोन महिन्यातील शिवाजीनगर येथील हवा गुणवत्ता निर्देशांक

४ नोव्हेंबर – २१६ वाईट

५ नोव्हेंबर – २०२ वाईट

११ नोव्हेंबर – ३०१ अतिवाईट

१२ नोव्हेंबर – २०० वाईट

१६ नोव्हेंबर – ३११ अतिवाईट

२६ नोव्हेंबर – ३०६ अति वाईट

२७ नोव्हेंबर – २१० वाईट

४ डिसेंबर – २०० वाईट

१२ डिसेंबर – २१३ वाईट

२० डिसेंबर – २०० वाईट

Story img Loader