मुंबई : मध्य रेल्वेवरील दिवा – मुंब्रादरम्यान गर्दीने भरलेल्या दोन लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू आणि नऊ जण जखमी झाल्याप्रकरणी मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान ९ जून रोजी ही घटना घडली. जेव्हा एक लोकल कसाराच्या दिशेला, तर दुसरी लोकल सीएसएमटीकडे जात होती. या लोकल एका तीव्र वळणावरून जात असताना प्रवासी पडले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवाज्यावर उभ्या असलेल्या काही प्रवाशांच्या बॅगा एकमेकांवर आदळल्याने ते रुळावर पडले. रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती या घटनेबाबत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभाग अभियंता आणि विभाग अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे रेल्वे पोलिसांनी यापूर्वी अपघाती मृत्युचा गुन्हा दाखल केला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे, अशी माहिती रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मुंब्रा दुर्घटनेची सखोल चौकशी केली असून यामागील कारणे शोधली आहेत, असे मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सांगितले.