मुंबई : बनावट नकाशाचा आधारे मढ परिसरात अनधिकृतपणे करण्यात आलेल्या बांधकामांविरोधातील कारवाई महानगरपालिका प्रशासनाने अधिक तीव्र केली असून या मोहीमेअंतर्गत मालाडच्या मढ परिसरातील एरंगळ आणि वलनाई येथील १४ अनधिकृत बांधकामे मंगळवारी निष्कासित करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेने मागील दोन आठवड्यात एकूण २४ बांधकामे जमीनदोस्त केली. सुमारे १०१ अनधिकृत बांधकामे मे अखेरपर्यंत निष्कासित करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.
बनावट नकाशाचा आधार घेऊन मागील वर्षभरात मढ भागात १०१ अनधिकृत बांधकामे उभारण्यात आल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर, महानगरपालिका उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे आणि पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांच्या नेतृत्वात निष्कासनाची कारवाई हाती घेण्यात आली आहे. मागील आठवड्यात करण्यात आलेल्या दोन कारवाईत एक बंगला आणि अन्य ९ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी अधिक तीव्र करून १४ बांधकामे निष्कासित करण्यात आली. यापैकी ३ बांधकामे एरंगळ परिसरातील असून त्यांचे क्षेत्रफळ अनुक्रमे १९००, १७०० आणि ६५० चौरस फूट आहे. उर्वरित ११ बांधकामे वलनाई गावातील असून त्यांचे क्षेत्रफळ प्रत्येकी २०० ते ३०० चौरस फूट इतके आहे. तीन जेसीबी आणि अन्य अद्ययावत संयंत्राच्या सहाय्याने संबंधित परिसरातील अनधिकृत बांधकामांचे पाडकाम करण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे १० अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, बनावट नकाशा प्रकरणातील एकूण १०१ अनधिकृत बांधकामे मे अखेरपर्यंत निष्कासित करण्यात येतील. तोपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.