लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : निवडणुकीच्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयातील जवळपास ३० टक्के कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात रुग्णालयातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे याचा परिणाम रुग्णालयातील आरोग्य सेवेवर होत आहे, ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा सुरळीत राहावी यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा विचार मुंबई महानगरपालिका प्रशासन करत आहे.
देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक आयोगाने सर्वच सरकारी कार्यालयातील ठराविक कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी यांच्याबरोबरच निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही निवडणुकीच्या कामावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेची वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील जवळपास ३० टक्के कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामावर नियुक्ती करण्यात आल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होताना दिसत आहे.
आणखी वाचा-मुंबई : मुलुंडमध्ये व्यवसायिक इमारतीला आग, ४० ते ५० जणांची सुटका
रुग्णालयातील परिचारिका, रक्त तपासणी तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, प्रयोगाळा तंत्रज्ञ निवडणुकीच्या कामावर गेल्याने रुग्णसेवेवर होत असलेला परिणाम टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासंदर्भात विचार करत आहे. त्यानुषंगाने रुग्णालय प्रमुखांकडून निवडणुकीच्या कामावर पाठविण्यात आलेल्या निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात येत आहे. तसेच किती निम्नवैद्यकीय कर्मचारी लागतील याचा अंदाज मागविण्यात येत आहे. त्या मागणीनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
निवडणूक कामावर नियुक्ती करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये शीव रुग्णालयातील ११० कर्मचारी, केईएम रुग्णालयातील १३० कर्मचारी, नायर रुग्णालयातील १०० कर्मचारी, नायर दंत महाविद्यालयातील १०० कर्मचारी आणि आरोग्य विभागातील जवळपास २०० कर्मचाऱ्यांची निवडणूक कामावर नियुक्ती करण्यात आली आहे.