मुंबई : महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत साफसफाई आणि परिवहन खात्याचे खाजगीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र, या निर्णयाला स्वच्छता कामगार, कर्मचारी प्रचंड विरोध करीत असून ‘एरिया बेस’च्या नावाखाली कंत्राटदारामार्फत स्वच्छता करून घेण्यासाठी पालिकेने प्रसिद्ध केलेली निविदा रद्द करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत बुधवारी दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेने ही निविदा रद्द करावी, अन्यथा खाजगीकरणाविरोधात १७ जून रोजी पालिकेचे स्वच्छता कामगार, कर्मचारी आंदोलन करतील, असा इशारा या मेळाव्यात देण्यात आला.
महानगरपालिकेतील घन कचरा व्यवस्थापन खात्यात काम करणारे मोटरलोडर कामगार आणि परिवहन खात्यातील कामगारांचे कायमस्वरूपी काम काढून ते कंत्राटदारामार्फत करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतची निविदा १४ मे रोजी काढण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापन खात्यातील खाजगीकरणाला कामगार, कर्मचाऱ्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. घनकचरा व्यवस्थापन खात्यातील एरिया बेसच्या नावाखाली संपूर्ण मोटरलोडर आणि परिवहन पालिकेच्या कायमस्वरुपी कामगारांच्या नोकऱ्या हिरावून घेण्याचे धोरण पालिका प्रशासनाने अवलंबिल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे. या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी पालिकेतील विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्यावतीने बुधवारी दादरमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मोठ्या संख्येने कामगार, कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना तातडीने पत्र पाठवून कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये असलेली नाराजी कळविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच, प्रशासनाने सफाई आणि परिवहन खात्याच्या खाजगीकरणासाठी काढलेली निविदा तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करावे. जर पालिका प्रशासनाने १६ जूनपर्यंत निविदा रद्द केल्या नाहीत, तर १७ जून रोजी आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ऐन पावसाळ्यात मुंबईतील जनतेला त्रास होऊ नये, यासाठी पालिकेने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.