मुंबई : ख्यातनाम माहितीपट निर्माते आणि दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांचे माहितीपट पाहण्याची आणि त्यांचे विचार ऐकण्याची संधी ‘आनंद पटवर्धन : अ रेट्रोस्पेक्टिव्ह’ या खास कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ आनंद पटवर्धन यांनी त्यांच्या माहितीपटातून विविध विषयांवरील परखड वास्तव प्रेक्षकांसमोर ठेवले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या प्रत्येकाशी लढा देत आपले माहितीपट लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या आनंद पटवर्धन यांचे काही निवडक माहितीपट पाहण्याची संधी ‘सिनेमा हाऊस’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंद पटवर्धन : अ रेट्रोस्पेक्टिव्ह’च्या निमित्ताने मिळणार आहे.

‘आनंद पटवर्धन : अ रेट्रोस्पेक्टिव्ह’ हा माहितीपट महोत्सव २ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत महालक्ष्मी येथील ‘जी ५ ए’ सभागृहात होणार आहे. या महोत्सवाला २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता सुरुवात होणार असून यावेळी ‘प्रिझनर्स ऑफ कॉन्शन्स’ आणि ‘बॉम्बे : अवर सिटी’ हे दोन माहितीपट दाखवण्यात येणार आहेत. त्यानंतर लेखक नरेश फर्नांडिस हे आनंद पटवर्धन यांच्याशी संवाद साधणार आहेत.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘अ टाईम टु राईज’, ‘इन मेमरी ऑफ फ्रेंड्स’, ‘वुई आर नॉट युवर मंकीज’ आणि ‘रिबन्स फॉर पीस’ हे माहितीपट दाखवण्यात येणार असून त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड या आनंद पटवर्धन यांच्याशी संवाद साधणार आहेत.

शनिवारी, ४ ऑक्टोबरला सकाळी १०.३० वाजता ‘फादर, सन अँड होली वॉर’, दुपारी १.३० वाजता ‘अ नर्मदा डायरी’, ३.३० वाजता ‘वॉर अँड पीस’ आणि सायंकाळी ७ वाजता ‘जय भीम कॉम्रेड’ हे माहितीपट दाखवण्यात येणार आहेत. त्यानंतर लेखक, विचारवंत आनंद तेलतुंबडे हे आनंद पटवर्धन यांच्याशी संवाद साधणार आहेत. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रविवारी, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता ‘विवेक’ या माहितीपटाचा पहिला आणि दुसरा भाग दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर पत्रकार कुणाल पुरोहित हे आनंद पटवर्धन यांच्याशी संवाद साधणार आहेत. या महोत्सवाचा समारोप सायंकाळी ७ वाजता आनंद पटवर्धन यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या माहितीपटाने होणार आहे.