मुंबई : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी अशा ५२० किमीच्या टप्प्यावरून पाच तासात प्रवास करण्यासाठी वाहनचालक/प्रवाशांना ९०० रुपये इतका टोल भरावा लागणार आहे. जितका प्रवास तितका टोल या तत्त्वावर टोलवसुली करण्यात येणार आहे. त्यानुसार ५२० किमीच्या मार्गात १९ टोल नाके कार्यान्वित करण्यात आले असून हे टोलनाके १९ एक्झिट पॉइंटवर आहेत.

मुंबई ते नागपूर अशा ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू आहे. हा महामार्ग पूर्ण करण्यात विलंब झाला आहे. त्यामुळे जितका मार्ग पूर्ण झाला आहे तितका मार्ग टप्प्याटप्प्यात वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. त्यानुसार याआधी नागपूर ते सेलू बाजार असा २१० किमीच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार होते. मात्र हे लोकार्पण बांधकामाधीन पूल कोसळल्याने रद्द करण्यात आले. यानंतरही लोकार्पणासाठी अनेक मुहूर्त जाहीर झाले, मात्र लोकार्पण काही झाले नाही. पण आता मात्र समृद्धीच्या लोकार्पणासाठी ११ डिसेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी अशा ५२० किमीच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हा मार्ग सेवेत दाखल झाल्यास नागपूर ते शिर्डी अंतर केवळ पाच तासात पार करता येणार आहे. मात्र या प्रवासासाठी वाहनचालक/प्रवाशांना ९०० रुपये टोल भरावा लागणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. टोलसाठी नियमानुसार १.७३ रुपये प्रति किमी असे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार जितका किमी प्रवास तितका टोल वसूल करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक एक्झिट पॉइंटवर टोलनाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यानुसार ५२० किमी अंतरात १९ टोलनाके असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर १.७३ प्रति किमीप्रमाणे ५२० किमी प्रवासासाठी अंदाजे ९०० रुपये मोजावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टोलनाके उभारतानाच प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे काम वेगात सुरू आहे.

सध्या १८ पेट्रोल पंप, शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फूड प्लाझा बांधण्याचे काम सुरू आहे. पण प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या तात्पुरत्या स्वरूपात खानपानाची सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

पंतप्रधानांच्या हस्ते ११ डिसेंबरला उद्घाटन

नागपूर: मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरच्या टप्प्याचे ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. पंतप्रधान या मार्गाची हवाई पाहणी करण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. महामार्गावरील वायफड (जि. नागपूर) टोलनाक्याजवळ लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैशिष्टय़े.. लांबी ७०१ किलोमीटर, नागपूर ते शिर्डी टप्पा ५२० कि.मी.चा, वाहन वेगमर्यादा १२० कि.मी. प्रतितास, नागपूर ते मुंबई अंतर ८ तासांत पार करण्याचे उद्दिष्ट, दहा जिल्ह्यांतील ३९० गावांना जोडणारा महामार्ग