मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळी बीडीडी पुनर्विकासातील दोन इमारतीचे काम पूर्ण झाल्याने गुरुवारी ५५६ रहिवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घरांचा ताबा दिला जाणार आहे. त्यामुळे ५५६ रहिवाशांचे १६० चौ. फुटाच्या घरातून ५०० चौ. फुटाच्या घरात वास्तव्यास जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आता नायगाव बीडीडी चाळीतील ८६४ बीडीडीवासियांचेही नव्या आणि मोठ्या घरात रहावयास जाण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण म्हाडाच्या मुंबई मंडळाने नायगावमधील पाच पुनर्वसित इमारतींच्या कामाला वेग दिला असून या इमारतींचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.
उर्वरित येत्या काही दिवसात पूर्ण करत या इमारतींना निवासी दाखला प्राप्त करुन घेण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करत सप्टेंबर अखेर ८६४ रहिवाशांना घरांचा ताबा देण्याची तयारी मंडळाने सुरु केली आहे. त्यामुळे ८६४ रहिवाशांची दिवाळी नव्या, मोठ्या घरात होणार आहे.
वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव येथे पहिल्या टप्प्यात पुनर्वसित इमारतींची कामे सुरु आहेत. वरळीतील दोन पुनर्वसित इमारतीतील ५५६ रहिवाशांना घराचा ताबा मिळणार आहे. तर नायगावमध्ये पहिल्या टप्प्यात आठ पुनर्वसित तर दुसर्या टप्प्यात आणखी तीन इमारतींचे काम सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील ८६४ घरांचा समावेश असलेल्या पाच पुनर्वसित इमारतींचे काम डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण करत या घरांचा ताबा डिसेंबरअखेर देण्याचे मंडळाने निश्चित केले होते.
मात्र आता मागील काही महिन्यांपासून येथील पुनर्वसित इमारतींच्या कामाला वेग दिल्याने पाच इमारतीचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. तर जी काही कामे राहिली आहेत ती पूर्ण करण्यास अधिक अवधी लागणार नाही. त्यामुळे उर्वरित काम येत्या काही दिवसात पूर्ण होईल अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. एकीकडे उर्वरित कामे पूर्ण करतानाच दुसरीकडे या इमारतींना निवासी दाखला देण्याची प्रक्रिया सुरु करत सप्टेंबरअखेरपर्यंत ८६४ रहिवाशांना घरांचा ताबा देऊ असा दावाही मुंबई मंडळाने केला आहे. त्यामुळे वरळीपाठोपाठ नायगावमधील ८६४ रहिवाशांचे २३ मजली इमारतीतील ५०० चौ. फुटाच्या घरात रहायला जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
नायगावमधील ३३४४ रहिवाशांचे पुनर्वसन २३ मजली २० पुनर्वसित इमारतीत करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आठ तर दुसर्या टप्प्यात १२ पुनर्वसित इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ इमारतींचे काम सुरु असून दुसर्या टप्प्यातील १२ पैकी तीन इमारतींचे काम सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील आठपैकी पाच इमारतींचे काम पूर्ण झाल्याने आता ८६४ रहिवाशांचा सप्टेंबरअखेर घरांचा ताबा दिला जाणार आहे. तर पहिल्या टप्प्यातील उर्वरित ५३७ घरांचा समावेश असलेल्या तीन पुनर्वसित इमारतींच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. या इमारतीचे १००टक्के काम पूर्ण करत निवासी दाखला घेत या घरांचा ताबा डिसेंबरअखेर देण्याचे नियोजन असल्याचेही मंडळातील वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे नायगाव बीडीडीवासियांसाठी ही बाब आनंदाची असणार आहे.