केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपानंतर आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुशांत सिंहची व्यवस्थापक असणाऱ्या दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत. मुंबईतल्या मालवणी पोलीस स्टेशनने ४८ तासांमध्ये यासंदर्भात अहवाल सादर करावा असे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहे. त्यामुळे आता नारायण राणेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिशा सालियनची हत्या झाल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊ केला होता. तसेच हत्येआधी बलात्कार करण्यात आला होता असेही नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले होते. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर महिला आयोगाने यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. श्रीमती दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नसून त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना ४८ तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत,” असे रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला होता. “खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस” आणि आपण कुठे धावणार?,” असे राणेंनी म्हटले होते.

बलात्कार होत असताना बाहेर पोलीस सुरक्षा कुणाची होती – नारायण राणे

“आमच्याकडेही काही कागदपत्र आहेत. महाराष्ट्रात काही घटना घडल्या. ८ जूनला दिशा सालियानची बलात्कार करून हत्या केली. सांगितलं गेलं आत्महत्या केली. एक तर ती त्या पार्टीला जात नव्हती. तिला जबरदस्तीनं बोलावलं. तिचा मित्र रोहन राय यानं. त्यानंतर तिला थांबायला सांगितलं, ती थांबली नाही. ती घरी निघाली. त्यानंतर कोण कोण होते, पोलीस सुरक्षा कुणाला होतं, तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर पोलीस सुरक्षा कुणाची होती. तिच्या पोस्ट मॉर्टमचा अहवाल अजून बाहेर का आलेला नाही? ७ महिने झाले, अजून का बाहेर आला नाही? दिशा सालियान ज्या इमारतीत राहायची, त्या इमारतीच्या रजिस्टरची ८ जूनची पानं का नाहीत? कुणी फाडली?,” असा सवाल नारायण राणेंनी पत्रकार परिषदेमध्ये विचारला होता.

हत्या करण्यात आली तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती?

“त्यानंतर दिशा सालियन, सुशांतसिंहला जेव्हा कळलं, तेव्हा तो कुठएतरी बोलला की मी यांना सोडणार नाही. मग काही लोक त्याच्या घरी गेले. घरात जाऊन बाचाबाची झाली दिशा सालियानवरून. त्या बिचाऱ्याची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती? त्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही गायब कसे झाले? १३ जूनला रात्री सीसीटीव्हीचे कॅमेरे नव्हते. आधी होते असं सोसायटीतले लोक सांगतात. ठराविक माणसाची अँब्युलन्स कशी आली? ती कुणी आणली? रुग्णालयात कुणी नेलं? पुरावे नष्ट कुणी केले? याची चौकशी होणार. त्यात कोणते अधिकारी होते, तेही आता तिथे राहिलेले नाहीत. तेही आता सगळं उघडं करतील,” असेही नारायण राणे म्हणाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane difficulty is likely to increase due to his statement regarding disha salian after order to submit report from state women commission abn
First published on: 21-02-2022 at 18:17 IST