मुंबई : जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त सोमवारी मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलने फिनलँड इंटरनॅशनल स्कूलच्या शालेय शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) आणि प्रथमोपचार प्रशिक्षण दिले. यामुळे शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांबाबत होऊ शकणारी वैद्यकीय आपत्कालीन स्थिती हाताळता येणार आहे.
जवळपास ४० कर्मचारी कार्यशाळेत उपस्थित होते. या सत्रामध्ये दैनंदिन घटनांपासून महत्त्वपूर्ण आपत्तीजनक स्थितींपर्यंत विविध वैद्यकीय स्थितींबाबत माहिती देण्यात आली. सहभागींना किरकोळ जखमा जसे कट, ओरखडे, भाजणे, कीटकांचा दंश, मोच आणि नाकातून रक्त येणे, तसेच गुदमरणे, ऍलर्जीक प्रतिक्रिया (अॅनाफिलेक्सिस), फ्रॅक्चर, बेशुद्ध होणे, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या प्रमुख वैद्यकीय परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पुढील नुकसान टाळण्यासाठी सीपीआर कसे द्यावे, बेशुद्ध व्यक्तीला कशाप्रकारे शुद्धीवर आणावे, मलमपट्टी योग्यरित्या कशी बांधावी आणि फ्रॅक्चर कसे स्थिर करावे याबद्दल प्रात्यक्षिके देखील दाखवण्यात आली.
मानसिक आरोग्याचे महत्त्व ओळखून प्रशिक्षणात मानसिक त्रासाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे, विद्यार्थ्यांमधील शारीरिक व भावनिक दोन्ही आपत्कालीन परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी शिक्षकांना सुसज्ज करणे यावर देखील चर्चा करण्यात आली.
नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. झुबिन परेरा म्हणाले, मुले दिवसातील अधिक वेळ शाळेमध्ये व्यतित करतात, ज्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रथमोपचार व लाइफ सपोर्टमध्ये प्रशिक्षित असणे महत्त्वाचे आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो आणि वेळेवर हस्तक्षेपामुळे जीवन वाचू शकते तसेच गुंतागूंतींना प्रतिबंध होऊ शकतो. या उपक्रमामधून सामुदायिक जागरूकता, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि आपत्कालीन स्थितींमध्ये सुसज्जतेला चालना देण्याप्रती नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलची कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
फिनलँड इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक शशांक गोएंक म्हणाले, या कार्यशाळेचा शिक्षकांना फायदा होईल, ते जीवनदायी प्रथमोपचार व बीएलएस कौशल्यांसह सुसज्ज होतील, आपत्कालीन स्थितींची हाताळणी करण्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते विद्यार्थ्यांमध्ये लवकर मानसिक व वर्तणूकीमधील धोकादायक बदल ओळखण्यास सक्षम होतील. ही कौशल्ये व्यावसायिक विकास वाढवण्यासोबत सुरक्षित, अधिक सहाय्यक शालेय वातावरण निर्माण करण्याप्रती देखील योगदान देतात, तसेच वर्गाव्यतिरिक्त दैनंदिन जीवनात देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.