मुख्यमंत्री फडणवीस यांची पंतप्रधानांकडे मागणी
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाला जाऊ इच्छिणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेच्या सक्तीतून दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बुधवारी नवी दिल्लीत भेटून केली. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश महाराष्ट्रात राज्य सरकारच्या प्रवेशपरीक्षेतील गुणांच्याच आधारे घेण्याची परवानगी देण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘नीट’ची सक्ती घाईघाईने करू नये आणि दोन महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास करायला लावू नये, यासाठी पालक व विद्यार्थी यांच्याबरोबरच सर्वपक्षीय नेत्यांचाही केंद्र व राज्य सरकारवर दबाव आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ सक्ती केली असली तरी पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावून किंवा अध्यादेश काढून या सक्तीतून राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती पंतप्रधान मोदी यांना केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधानांशी या प्रश्नी झालेल्या चर्चेच्या वेळी राज्याच्या संदर्भात दोन-तीन मुद्दे उपस्थित केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, मराठीतून राज्य सरकारची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ची सक्ती केल्यास त्याची पुस्तकेच उपलब्ध नाहीत. राज्यातील २० टक्के विद्यार्थी हे सीबीएसईचे असून ८० टक्के राज्य शिक्षण मंडळाचे आहेत. ते विशेषत: ग्रामीण भागातील असल्याने या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे.