कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो – ३ची कारशेड उभारण्याच्या कामाला सुरुवात करता यावी यासाठी राज्य सरकारने गुरुवारी आरेतील कामावरील बंदी उठविली. या निर्णयानंतर ‘आरे वाचवा’ चळवळीतील आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी आता आरे वाचविण्यासाठी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. देशभरातील पर्यावरणप्रेमी, नागरिकांनी शक्य असेल तिथे ‘आरे वाचवा’ आंदोलन करून या चळवळीला पाठिंबा द्यावा, असे अवाहन मुंबईस्थित आंदोलकांनी समाज माध्यमावरून केले आहे.

आरे वाचविण्यासाठी २०१४ मध्ये चळवळ सुरू करण्यात आली. या चळवळीला मुंबईकरांचा मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत गेला आणि २०१९ मध्ये मोठी चळवळ उभी राहिली. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ऑक्टोबर १०१९ मध्ये रात्रीच्या वेळी झाडांची कत्तल केली आणि त्यानंतर आरेसाठी मुंबईसह देशभरात उस्फूर्तपणे आंदोलन सुरू झाले. आरेमध्ये कारशेड उभारण्यास होणारा विरोध लक्षात घेऊन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कारशेड कांजूरमार्गला हलविली. मात्र शिंदे सरकारने पुन्हा आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरेमधील जंगल वाचविण्यासाठी देशभरातील पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनी आंदोलनाला पाठींबा द्यावा. मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी देशव्यापी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमी आणि आरे संवर्धन गटाचे सदस्य संजीव वल्सन यांनी केले आहे.

आरेतील कामावरील बंदी उठविण्यात आली आहे. मात्र आरतील कारशेडच्या जागेतील झाडे कापण्यावर आजही सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती कायम आहे. कारशेडचे काम सुरू करण्यासाठी एमएमआरसीला हजारोंच्या संख्येने झाडे कापावी लागणार आहेत. पण यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरे परिसरातील झाडांना हात लावू देणार नाही. जंगल आणि झाडे वाचविण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई तीव्र करणार आहोत. पण त्याच वेळी जनचळवळ तीव्र करण्यात येईल. त्यासाठी देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आल्याचेही वल्सन यांनी दिली. तसेच रविवारी आरेमध्ये होणाऱ्या आंदोलनात मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.