प्रकल्प उभारणीतील अडथळे लक्षात घेऊन सरकारकडून चाचपणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोटय़वधी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करूनही प्रकल्पग्रस्तांचे पुढारी, आणि काही ठराविक राजकीय नेत्यांकडून चालू असलेला असहकार लक्षात घेता नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ कल्याणनीकच्या नेवाळी येथे हलविण्याच्या जोरदार हालचाली केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांच्या पातळीवर सुरू  झाल्या आहेत. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री गजपती राजू यांनी मंगळवारी दुपारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नवी मुंबई आणि नेवाळी अशा दोन्ही जागांचा पाहणीदौरा केला. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्य़ाद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन या मुद्दय़ावर सविस्तर चर्चाही केली.

नेवाळी येथे नौदलाची तब्बल १६०० एकर जमीन असून नवी मुंबईऐवजी या ठिकाणी विमानतळ उभारण्यात यावे, अशी मागणी यापूर्वीही तेथील लोकप्रतिनिधींकडून पुढे आली होती. केंद्र आणि राज्य सरकारसाठी नवी मुंबई विमानतळ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाची निविदा प्रकिया अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षांच्या सुरुवातीला या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होऊ शकेल, असे चित्र आजवर दिसत होते. यासंबंधी कामाची निविदा मार्गी लावण्यापूर्वी सिडकोने विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक अशा जमिनीचे सपाटीकरण, टेकडीची उंची कमी करणे आदी कामांना सुरुवात केली असून त्यासाठी १७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कामांचे वाटप काही ठेकेदारांना करण्यात आले आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा, यासाठी सिडकोचे वरिष्ठ अधिकारी विस्थापित होणाऱ्या गावांमधील ग्रामस्थांसोबत सातत्याने चर्चा करीत आले आहेत. प्रकल्पगस्तांच्या पुनवर्सनासाठी घसघशीत रकमेचे पॅकेज, तसेच २२ टक्क्यांच्या आसपास विकसित भूखंडांचा मोबदला देण्याचे आश्वासनही सिडकोमार्फत यापूर्वी देण्यात आले. असे असताना विमानतळ प्रकल्पाच्या परिसरातील दहा गावांमधील प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर आणि भूखंड करारनाम्यांना पुन्हा एकदा विरोध करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्प येथे होणार की नाही, याबाबत संबंधितांमध्ये चिंता आहे. विमानतळाचे काम जेथे सुरू होणार आहे, तेथील अधिकारी व साहित्य सामग्री यांच्या संरक्षणासाठी सशस्त्र सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णयही सिडकोने घेतला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आणि सिडकोमधील विसंवाद वाढीस लागला आहे. काही राजकीय नेत्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्यातील दरी आणखी रुंदावत आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या काय?

सिडको सर्वेक्षणातून सुटलेल्या सर्वच घरांना पर्यायी भूखंड देणे, बेकायदा बांधकामांना तिप्पट भूखंड देणे, तसेच विमानतळाच्या बांधकामात स्थानिक तरुणांना काम देणे अशा काही मागण्या नवी मुंबई विमानतळ प्रकल्पगस्त नेत्यांकडून पुढे रेटल्या जात आहे. यापैकी काही मागण्या अवास्तव असल्याचे लक्षात आल्याने गेल्या काही दिवसांपासून सिडको आणि प्रकल्पगस्त नेत्यांमधील संवाद थांबल्याचे कळते.

नेवाळीची हवाई पाहणी

नवी मुंबई विमानतळास पर्यायाची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री गजपती राजू यांनी मंगळवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाची जागा आणि नेवाळी या दोन्ही जागांची हवाई पाहणी केली. यावेळी राजू यांच्यासोबत नागरी उड्डाण विभागाचे सचिव आर. एन.चौबे, विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष महापात्रा, सहसचिव अरुणकुमार, राज्याचे वरिष्ठ अधिकारी शामलाल गोयल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कल्याणपासून सहा किमीवर..

नेवाळीचा परिसर कल्याणपासून सुमारे सहा किमी अंतरावर असून, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तेथे नौदलाचा तळ उभारण्यात आला होता. त्यावेळी तेथे बांधण्यात आलेली धावपट्टी आजही त्या दिवसांची साक्ष देते. तेथील सुमारे १६०० एकर जागेवर विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव याआधी वेळोवेळी मांडण्यात आलेला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai airport is now in newali
First published on: 24-08-2016 at 02:57 IST