खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. “मी पूर्ण ताकदीने मुंबई पालिका निवडणुकीत उतरेल आणि पालिकेतील शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंका नष्ट करू,” असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं. त्या रविवारी (८ मे) मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या.

नवनीत राणा म्हणाल्या, “दोन पिढ्यांपासून मुंबई महानगरपालिका यांच्याकडे आहे. मात्र, येणाऱ्या काळात मुंबईची जनता आणि रामभक्त त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. मी पूर्ण ताकदीने मुंबई पालिका निवडणुकीत उतरेल. शिवसेनेने मुंबई पालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची लंका तयार केलीय. ती लंका आम्ही नष्ट करू.”

“मी पालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीने प्रचाराला उतरेल”

“मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईला न्याय देण्यासाठी, चांगला विकास व्हावा यासाठी आणि भ्रष्टाचाराची लंका संपवण्यासाठी मी पालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीने प्रचाराला उतरेल. जे रामभक्त आहेत त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना पाठिंबा देईल,” असं म्हणत नवनीत राणा यांनी शिवसेनेला आव्हान दिलं.

“मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर…”

“मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवा. त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील मतदारसंघ निवडावा, मी त्यांच्याविरोधात उभी राहील आणि निवडून येऊन दाखवू. तेव्हा त्यांना जनतेची ताकद काय असते हे कळेल,” असंही राणा यांनी नमूद केलं.

“१४ दिवसच काय, तर १४ वर्षे देखील तुरुंगात राहण्यास तयार”

नवनीत राणा पुढे म्हणाल्या, “माझा ठाकरे सरकारला सवाल आहे की मी अशी काय चूक केली की त्याची मला शिक्षा देण्यात आली. जर हनुमान चालिसाचं पठण करणं आणि भगवान श्रीराम यांचं नाव घेणं गुन्हा असेल आणि त्यासाठी मला १३-१४ दिवसांची शिक्षा ठाकरे सरकारने दिली असेल तर मी १४ दिवस नाही, तर १४ वर्षे तुरुंगात राहण्यास तयार आहे.”

“मी ही लढाई पुढेही लढत राहील”

“तुरुंगात टाकून ते एका महिलेचा आवाज दाबू शकतील असं त्यांना वाटत असेल, तर १४ दिवसात ही महिला दबली जाणार नाही. आमची लढाई देवाच्या नावाची आहे. मी ही लढाई पुढेही लढत राहील,” असं नवनीत राणा यांनी सांगितलं.

हेही वाचा : “आम्ही तुरुंगात असताना बीएमसीकडून नोटीस, मात्र १५ वर्षांपूर्वी…”, रवी राणा यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आज मी डॉक्टरांना विनंती करून डिस्चार्ज घेतला”

नवनीत राणा पुढे म्हणाल्या, “क्रुरपणे एका महिलेवर जी कारवाई झाली ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. डॉक्टरांनी माझी तातडीने तपासणी होऊन उपचार होणं गरजेचं असल्याचं लिहून दिलं तरी उपचार देण्यात आले नाहीत. तुरुंगात माझं मानसिक शोषण झालं. आज मी डॉक्टरांना विनंती करून डिस्चार्ज घेतला आहे. अजूनही माझ्या बऱ्याच तपासण्या बाकी आहेत.”