मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केल्यानंतर त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. नवनीत राणा यांच्या खारमधील इमारतीबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. मात्र, तरीदेखील आपण इमारतीमधून बाहेर पडून मातोश्रीला जाणार आणि तिथे हनुमान चालीसा पठण करणारच, असा निश्चत नवनीत राणा यांनी बोलून दाखवला आहे. यासंदर्भात आपल्या घराबाहेर माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

“लोक आत येईपर्यंत पोलीस काय करत होते?”

“आम्ही ९ वाजेची वेळ दिली होती. पण आमच्या दरवाज्याबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा उभा आहे. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काल मातोश्रीवर बैठक घेऊन पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यात पोलीस विभागाला बॅरिकेड्स हटवायला सांगितले. ते बॅरिकेड्स क्रॉस करून आमच्या गेटच्या आतपर्यंत शिवसेना कार्यकर्ते आले. आमच्यासोबत इथे इतरही १० कुटुंब राहतात. लोक आत शिरेपर्यंत पोलीस काय करत होते? कुणाच्या आदेशांवर पोलीस विभाग काम करतोय?”, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.

“मुख्यमंत्र्यांनीच कार्यकर्त्यांना हल्ल्यासाठी तयार केलं”

दरम्यान, यावेळी बोलताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच कार्यकर्त्यांना आपल्या घरावर हल्ला करण्यासाठी तयार केल्याचा गंभीर दावा केला आहे. “काल पूर्ण कुटुंबासह मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर आले. शिवसेना कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. पदाधिकाऱ्यांना हल्ला करण्यासाठी त्यांनी तयार केलं. काल रात्रीपर्यंत बॅरिकेड्सला कुणी शिवसेना कार्यकर्ते स्पर्श देखील करू शकत नव्हते. आज ते कार्यकर्ते बॅरिकेड्स तोडून गेटच्या आतपर्यंत कसे येतात? हा माझा प्रश्न आहे”, असं राणा यावेळी म्हणाल्या.

“एक तर पोलीस त्यांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या इच्छेनुसार काम करत आहेत. शिवसेना खुलेआम गुंडगिरी करत आहे. मी इथून बाहेर जाणार आणि मातोश्रीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पठण करणारच. आम्हाला कुणीही अडवू शकत नाही. तुमच्याकडे जरूर पोलीस प्रशासन असेल, पण आमच्या लोकांनीही आम्हाला ताकद दिली आहे. तुम्ही तुमच्या पिढीच्या भरवश्यावर खात आहात. आम्ही स्वत: आमचं भविष्य घडवून इथपर्यंत आलो आहोत. बजरंगबलीची ताकद आमच्यासोबत आहे. कुणीही आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही हे पोलीस विभागाला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही सांगणं आहे”, अशा शब्दांत खासदार नवनीत राणा यांनी निशाणा साधला.

“तुम्हाला खरं सांगू का? माझ्या…”, राणा दांपत्याच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जे मुख्यमंत्री दोन-अडीच वर्षांपासून कामावरच गेले नाहीत. बिनकामी पूर्ण पगारी असे आपले मुख्यमंत्री आहेत. काम काहीच केलेलं नाही, पण मुख्यमंत्रीपदाचा पूर्ण पगार त्यांनी घेतला”, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.