मुंबई : मुंबईत सर्वत्र मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा होत आहे. दांडिया – गरब्यासाठी तरुणाईला आकर्षित करण्यासाठी, तसेच त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी मंडळांकडून दररोज रात्री डीजेचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाने यंदा गणेशोत्सवात डीजेवर बंदी घातली होती. मात्र, नवरात्रोत्सवात त्याबाबत काहीही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

एकाच कायद्याच्या आधारे दोन भिन्न उत्सवांसाठी वेगवेगळे नियम का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डीजेच्या आवाजामुळे रुग्ण, विद्यार्थी, गर्भवती महिलांसह तान्ह्या बाळांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या डीजेमुळे नागरिकांची झोप उडाली आहे.

नवरात्रोत्सवात देवीचे जागरण, दांडिया, गरबा याद्वारे रात्र जागविण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या पारंपरिक उत्सवात डीजे संस्कृतीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. तरुणाई व मंडळांना डीजेच्या ठेक्याशिवाय उत्सव अपुरा वाटत असला, तरी या आवाजामुळे ध्वनीप्रदूषण, आरोग्याच्या समस्या डोके वर काढत आहेत. तसेच, कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळे या प्रकारावर बंदी घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

यंदा गणेशोत्सवात प्रशासनाने गणेश मंडळांना डीजेच्या वापर करण्यास बंदी घातली होती. तसेच, पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, नवरात्रोत्सवापूर्वी याबाबत सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. नवरात्रोत्सव सुरू होऊन तीन दिवस झाले, तरीही डीजेचा वापर कमी होण्याऐवजी वाढत असल्याने अनेक भागातील नागरिक वैतागले आहेत.

मानखुर्द, चेंबूर, कुर्ला, वडाळा, तसेच, पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, अंधेरी, मालाड, बोरिवली, कांदिवली आदी भागांमध्ये रात्री सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून दांडिया, गरब्यासाठी डीजेचा वापर केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकाच्या वापरावर बंदी असतानाही वेळेची मर्यादा ओलांडून अनेक ठिकाणी डीजेच्या कर्कश आवाजात गाणी सुरू जातात. त्यामुळे गर्भवती महिला व वृद्धांना प्रचंड त्रास होतो. विद्यार्थ्यांच्या अध्यापनावरही परिणाम होत असल्याची खंत काही पालकांनी व्यक्त केली आहे.

याबाबत मराठी एकीकरण समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. मुंबईतील दोन मोठ्या आणि लोकप्रिय उत्सवांच्या डीजेच्या वापराबाबतच्या नियमांमध्ये विसंगती दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. डीजेच्या वापराला बंदी असतानाही अनेक ठिकाणी ध्वनिप्रदूषणविषयक नियमाचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सुसंगत आणि पारदर्शक धोरण आखण्याची त्यांनी मागणी केली आहे.

डीजेमुळे भांडणे, किरकोळ हिंचाराच्याही घटना

डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे सर्वच वयोगटांतील व्यक्तींना त्रास होतो. अनिद्रा, उच्च रक्तदाब, मानसिक तणाव आदी समस्या नागरिकांना सतावतात. तसेच, काही ठिकाणी डीजेवरून तरुणांमध्ये वाद, भांडणे, किरकोळ हिंचाराच्याही घटना घडत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.