नवाब मलिक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ मंत्री, आमदारांचा ठिय्या

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना समर्थन देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या राजकीय दडपशाहीच्या विरोधात महाविकास आघाडीचे मंत्री व आमदारांनी गुरुवारी मंत्रालयाच्या शेजारील महात्मा गांधी यांच्या पुतळय़ासमोर धरणे आंदोलन केले.

‘महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार..’ अशा घोषणा देत भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचा संदेश याद्वारे देण्यात आला. जमीन खरेदीतील गैरव्यवहारप्रकरणी मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी अटक केल्यानंतर महाविकास आघाडीने केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरून भाजपविरोधात संघर्षांचा पवित्रा घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून गुरुवारी गांधी पुतळय़ाजवळ मंत्री व आमदारांचे धरणे आंदोलन आणि शुक्रवारपासून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे मंत्री आंदोलनस्थळी दाखल झाले. महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसचे मंत्री आल्यानंतरही शिवसेनेचा एकही मोठा नेता किंवा मंत्री हजर नसल्याने उपस्थित मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली आणि कुजबुजही सुरू झाली. माध्यमांवरूनही शिवसेनेचा एकही मंत्री नसल्याचे प्रसारित झाल्याने तर्कवितर्क सुरू झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लागलीच शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना दूरध्वनी केले. तेवढय़ात आमदार सुनील राऊत व मनीषा कायंदे कार्यकर्त्यांसह आंदोलनस्थळी आले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत हे उत्तर प्रदेशात प्रचार दौऱ्यावर गेले असून अनिल परब यांच्यासह अनेक मंत्री व नेते भराडीदेवीच्या यात्रेसाठी आधीच कोकणात गेले असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत, असे सुनील राऊत व मनीषा कायंदे यांनी स्पष्ट केले. तसेच नवाब मलिक यांच्यावरील कारवाईचा निषेध करत भाजपच्या दडपशाहीला व सुडाच्या राजकारणाला कोणीही घाबरणार नाही, सरकारवर त्याचा परिणाम होणार नाही, असे टीकास्त्र मनीषा कायंदे यांनी सोडले. त्यानंतर थोडय़ाच वेळात उद्योगमंत्री सुभाष देसाई आंदोलनस्थळी आल्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या मंत्र्यांनी सुस्कारा सोडला.

नवाब मलिकांनी काहीही चुकीचे केलेले नाही. दाऊदचे संबंध मुद्दाम मलिकांसोबत जोडले जात आहेत. बॉम्बस्फोटाचा मलिकांसोबत काहीही संबंध नाही. ज्या ठिकाणी केंद्र सरकारला विरोध केला जातो तिथे अशी कारवाई केली जाते. नवाब मलिकांवर केलेले आरोप चुकीचे आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी जास्त काहीही बोलणार नाही. नवाब मलिक यावर सविस्तर उत्तर देतील, राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तर २० वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणाशी काहीतरी करून धागेदारे जुळवण्याचा प्रयत्न करून नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधातील लढय़ात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत खंबीरपणे उभा आहे. ज्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे, असे महसूूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

मलिक यांच्यावर केलेली कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने केलेली असून हे अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण देशात सुरू झाले आहे. मंत्र्याला अशा पद्धतीने अटक करणे लोकशाहीला मारक आहे. केवळ संशयाच्या आधारावर ही कारवाई केलेली असून हा चुकीचा पायंडा पाडला जातोय, अशी टीका सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.  

मंत्र्याला अटक करणे लोकशाहीला मारक : काँग्रेस 

मुंबई : केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई केली गेली आहे, त्यांचा राजीनामा मागण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही. एका मंत्र्याला अशा प्रकारे अटक करणे लोकशाहीला मारक आहे, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

नवाब मलिक यांच्या अटेकच्या निषेधार्ह व केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात महाविकास आघाडीने गुरुवारी मंत्रालयाजवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळय़ासमोर आंदोलन केले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई केलेली आहे. भाजपला मलिक यांचा राजीनामा मागण्याचा आणि आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्यांच्या मुलाने शेतक-यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन करावे, असे टोलाही त्यांनी हाणला. अशोक चव्हाण म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर केलेली कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने केलेली असून हे अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण देशात सुरू झाले आहे. मंत्र्याला अशा पद्धतीने अटक करणे लोकशाहीला मारक आहे.