राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे मागील अनेक आठवड्यांपासून अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानला क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर मलिक यांनी समीर वानखेडेंनी ते मुस्लीम असल्याचं लपवून आरक्षणाचा लाभ घेत नोकरी मिळवल्याचा आरोप केला. त्यानंतर वेळोवेळी कधी ट्विटरवरुन तर कधी थेट पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोप केले. समीर यांच्या बाजूने त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रसारमाध्यमांसमोर बाजू मांडण्यास सुरुवात केली. क्रांती आधी मलिक यांचं नाव घेणं टाळत होती मात्र आता ती थेट नाव घेऊन टीका करु लागलीय. मलिक आणि वानखेडे वादामधून क्रांती आणि मलिक यांच्या कन्येमध्येही ट्विटरवर नुकताच वाद झाला. असं असतानाच आता नवाब मलिक यांनी क्रांती रेडकरच्या चॅटचा एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत तिच्यावर निशाणा साधलाय. मात्र या स्क्रीनशॉर्टबद्दल क्रांतीने काही तासांनी खुलासा केला असून हा सर्व प्रकार कोणत्या थराला चाललाय अशा शब्दांमध्ये तिने संताप व्यक केलाय.

मागील काही आठवड्यांपासून वानखेडे कुटुंबीय वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन आपली बाजू मांडत आहेत. दरम्यानच्या काळात नवाब मलिक यांनी दाऊदशी संबंधित संपत्ती घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर मलिक यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. याच वादाच्या पार्श्वभूमीवर एका युझरने क्रांतीला मलिक आणि दाऊद कनेक्शनसंदर्भात माहिती असल्याचं सांगितलं. त्याच विषयावरील हे चॅट आहे.

नक्की वाचा >> वाशीमधील ‘त्या’ बारचे मालक आपणच असल्याचं सांगत समीर वानखेडे म्हणाले, “मी २००६ पासूनच…”

मलिक यांनी शेअर केलेला संवाद हा ट्विटरवरील आहे. यामध्ये एका युजरने क्रांती रेडकरला माझ्याकडे नवाब मलिक यांचे काही फोटो असल्याचं सांगितलं आहे. “क्रांती रेडकर मॅडम माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा संबंध असल्याचे पुरावे आहेत, अधिक माहितीसाठी थेट मेसेज करा,” असं या युझरने म्हटलं आहे. त्यावर रात्री पावणे अकराच्या सुमारास क्रांती रेडकरने, “तुमच्याकडे काय पुरावे आहेत?”, असा रिप्लाय केलाय. “माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा फोटो आहे,” असं या युझरने म्हटलंय. त्यावर पुढच्या मिनिटालाच क्रांतीने, “कृपया तो फोटो पाठव. याबदल्यात तुला योग्य तो मोबदला मिळेल,” असा रिप्लाय केलाय. या संवादाचा स्क्रीनशॉर्ट मलिक यांनी, “अरे देवा…” अशा कॅप्शनसहीत शेअर केलाय.

मात्र या ट्विटनंतर काही तासांनी क्रांतीने ट्विट करत हा सारा प्रकार म्हणजे बनाव असल्याचं म्हणत संताप व्यक्त केलाय. नवाब मलिक यांनी जो फोटो शेअर केलाय हो एका सटायर म्हणजेच उपहासात्मक मिम्स आणि फोटो तयार करणाऱ्या अकाऊंटवरील असून तो एडीटेड कंटेट असल्याचं या अकाऊंटची मालकी असणाऱ्या व्यक्तीनेच म्हटलं आहे. क्रांतीने हे स्क्रीनशॉर्ट शेअर करत, “हा प्रकार एवढ्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं,” असं म्हटलंय.

सोमवारीच मलिक यांनी दोन व्यक्तींचा फोटो ट्विट केला असून हा फोटो निकाहच्या वेळेच्या असल्याचं सांगत फोटोमधील व्यक्ती समीर वानखेडे असल्याचा दावा केला होता. “कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?”, अशा कॅप्शनसहीत मलिक यांनी हा फोटो शेअर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मलिक यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये डावकडे बसलेली व्यक्ती ही समीर वानखेडे असल्याचा दावा करण्यात येतोय. तर या व्यक्तीच्या समोर बसलेली व्यक्ती मुस्लीम धर्मगुरु असून फोटोत दिसणारे वानखेडे हे निकाहनाम्यावर स्वाक्षरी करत असल्याचा दावा करण्यात आलाय. फोटोमध्ये जी व्यक्ती समीर वानखेडे असल्याचा दावा केला जातोय तिने मुस्लीम बांधव घालतात त्याप्रमाणे डोक्यावर गोल टोपी घातल्याचं दिसत आहे.