मुंबई: ‘मी देशद्रोही असे माजी मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल म्हणालो होतो. माझा इतर सदस्यांना देशद्रोही म्हणण्याचा कोणताही हेतू नव्हता, अशी सारवासारव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. मुंबई बॉम्बंस्फोटातील खटल्यातील आरोपीबरोबर मलिक यांचे संबंध असल्याचे त्यांच्यावर टाकलेल्या छाप्यावरून सिद्ध होत आहे. सरकारी तपास यंत्रणांनी त्यांना कैद केले आहे.
स्फोटातील आरोपींच्या मालमत्ता खरेदी करण्यात मलिक यांचा हात आहे. मलिक यांना देशद्रोही म्हणून मी चूक केली असेल तर मी ती चूक पन्नासवेळा करायला तयार आहे. उलट आम्हाला महाराष्ट्रद्रोही सरकार म्हणून विरोधी पक्षांनी वारंवार हिणवले आहे.तरीही आम्ही शांत आहोत’, असे शिंदे यांनी सांगितले. यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या आमदारांनी शिंदे यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार अनिल परब म्हणाले की, आपणदेखील महाविकास आघाडी सरकारमध्ये होता. त्यावेळी तुम्हाला मलिक हे देशद्रोही वाटले नाहीत. शिवसेनेने १९९३ च्या मुंबईतील दंगलीच्यावेळी शांतता राखण्यासाठी काय काय केले होते ते तुम्हाला माहित आहेच. कोण देशद्रोह्याच्या बाजूने आहे, हे तुम्ही ओळखता, असे परब यांनी सांगितले.
याच वेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या विशेषाधिकार भंगावरून राऊत यांच्या विरोधात कारवाईची सत्ताधाऱ्यांकडून मागणी करण्यात आली. उपसभापती गोऱ्हे यांनी सांगितले की, या सदनाची हक्कभंग समिती स्थापन झाली नाही. त्यामुळे समिती स्थापन झाल्यावर हक्कभंग समितीकडे प्रस्ताव पाठवला जाईल. त्यापूर्वी मी त्या संदर्भात निर्णय घेईन. मात्र खासदार संजय राऊत यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला जाईल. त्यांची बाजू समजून घेतल्यानंतर मी निर्णय घेईन. यानंतर आमदार राम शिंदे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सभागृहात मांडला.