केंद्रात कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळाले. परंतु काँग्रेसविरोधातील नाराजीचा फटका राष्ट्रवादीलाही बसला अशी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी लोकसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर अप्रत्यक्षपणे काँग्रेसवरच फोडले. मतदारांच्या नाराजीमुळे राष्ट्रवादीने केलेली चांगली कामे दृष्टिआड झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत भाषण करताना पवार यांनी, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, असे सूचित केले. जागावाटपाची चर्चा वा वाटाघाटी करताना पक्षाला योग्य सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी विधानसभा निवडणुकीत नक्कीच फरक पडेल, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.
लोकसभेत पराभव झाला तरी अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्यास नक्कीच फरक पडेल, असे मत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. लोकसभेच्या वेळी विरोधी लाट ही काँग्रेसच्या विरोधात होती, पण त्यात राष्ट्रवादी भरडली गेली, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री बदलाची मागणी आम्ही केलेली नाही. मुख्यमंत्री राहो वा बदलो आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीलाच सर्वाधिक जागा मिळतील, असे सांगत बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. पवार यांच्याकडे नेतृत्व सोपविण्याची काँग्रेस नेत्यांची इच्छा असली तरी राज्यातील नेत्यांचा विरोध आहे. मात्र काँग्रेसचे नेतृत्व करण्याकरिता शरद पवार मोकळे नाहीत, असा टोलाही त्यांनी मारला. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तरीही विधानसभेत चांगले यश मिळेल, असा दिलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न केला. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, आघाडीत राष्ट्रवादीला जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी केली.
तेव्हा का नाही सूत्र मान्य केले?
राष्ट्रवादीने जास्त जागांची मागणी करताना २००९च्या निवडणुकीच्या सूत्राचा आधार घेतला आहे. पण २००९च्या सूत्रानुसार अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीने काँग्रेसला जास्त जागा का सोडल्या नाहीत, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी मोदी यांना भरभरून मते दिली. पण महिनाभरातच मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेची निराशा केली आहे. महागाई वाढत आहे. महागाईविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी.