scorecardresearch

देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेल्या व्हिडीओत नावाचा उल्लेख; शरद पवार म्हणाले, “माझं कधी…”

या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकार चौकशी करेल, शरद पवारांची माहिती

NCP, Sharad Pawar, BJP, Devendra Fadanvis, Devendra Fadanvis Allegations
या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकार चौकशी करेल, शरद पवारांची माहिती

महाविकास आघाडीतील सत्तारूढ शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपा यांच्यात मंगळवारी आरोपांची धुळवड रंगली़ राज्य सरकारने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना खोटय़ा गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. फडणवीस यांच्या गौस्यस्फोटानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते गोंधळले होते. व्हिडीओच सादर केल्याने त्याला प्रत्युत्तर कसे द्यायचे यावर चर्चा सुरू झाली. गृहमंत्री वळसे-पाटील हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मगच उत्तर देणार आहेत. दरम्यान या व्हिडीओंमध्ये शरद पवारांच्या नावाचाही उल्लेख असून त्यांनी यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीसांनी केलेल्या गंभीर आरोपांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “१२५ तास रेकॉर्डिंग केल्याचं….”

माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं पण माझा काही संबंध नसल्याचं शऱद पवारांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, “या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकार चौकशी करेल. त्याची सत्यता असत्यता तपासेल. त्यात माझंही नाव घेतलेलं दिसतं. माझं कधी या संबंधात कुणाशी बोलणं व्हायचं कारण नाही. कधी काळी वर्ष सहा महिन्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या सहकाऱ्याबाबत तक्रार आली होती. मी त्यांना कळवली. त्यांना सांगितलं त्यात सत्यता किती तुम्ही पाहा. तुमच्या सहकाऱ्याबाबतची ही तक्रार आहे”.

आरोपांची धुळवड : ‘भाजप नेत्यांविरोधात सरकारचे कारस्थान’

“एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनात कार्य करते तेव्हा त्यावर शहानिशा न करता बोलणं योग्य नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर त्यांच्याकडून मला एवढंच कळलं की तुम्ही सांगितलेल्या लोकांच्या तक्रारीत मी लक्ष घातलं. अशा प्रकारच्या गोष्टी होता कामा नयेत याची काळजी घेईल. हा प्रश्न माझ्याबाबत तिथे संपला.’ असं शरद पवार म्हणाले.

“१२५ तासांची रेकॉर्डिग होते ही कौतुकास्पद बाब”

तपास यंत्रणांचा वापर करूनही महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात यश येत नसल्यानेच ही टोकाची भूमिका फडणवीस यांनी घेतली असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, “सरकारी अधिकाऱ्यांची १२५ तासांची रेकॉर्डिग होते ही कौतुकास्पद बाब आहे. केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय हे अशक्य आहे. अनिल देशमुखांविरोधात ९० छापे टाकण्यात आले. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी केली जाते याचं उत्तम उदाहरण देशमुखांचं आहे”.

“ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. मला कौतुक वाटतं एका शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्याच्या संबंधित १२५ तासांची रेकॉर्डिंग करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले ही कौतुकास्पद बाब आहे. १२५ तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल याचा हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब आहे. १२५ तास रेकॉर्डिंग काम करण्याचं काम खरंच असेल तर शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा एजन्सी या फक्त भारत सरकारकडे आहेत. त्यामुळे राज्यात जाऊन राज्यात जाऊन राज्य सरकारच्या एखाद्या कार्यालयात जाऊन तास न् तास जे काही काम केलं टेप केलं रेकॉर्ड करायला ते यशस्वी झाले ते खरं आहे की नाही ते सिद्ध झालं पाहिजे,” असं शरद पवार म्हणाले.

“मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही”

शरद पवार यांनी यावेळी नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. “नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा संबंधच नाही. नवाब मलिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी असून मुस्लिम कार्यकर्त्याचं नाव दाऊदशी जोडायचं हे घृणास्पद आहे,” असं शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp sharad pawar on bjp devendra fadnavis allegations in assembly sgy

ताज्या बातम्या