दलित, नवबौद्धांनी वंचित आघाडीला पाठिंबा दिल्याने त्याचा फटका बसला असून हा समाज राष्ट्रवादी काँग्रेसकडे कसा येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मुंबईत केले. भाजपने केंद्र व राज्यातील सत्तेचा वापर निवडणुकीत पुरेपूर केल्याचा आरोप करीत पवार यांनी मुंबई-ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी पावले टाकणार असल्याचे स्पष्ट केले.

विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींच्या उपस्थितीत रविवारी झाली. त्या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले, विधानसभेचा निकाल संमिश्र असून काही ठिकाणी आणखी काम करण्याची गरज असल्याचे जनतेने लक्षात आणून दिले आहे. भाजपने सत्तेचा पुरेपूर वापर केल्याने आणि अन्य कारणांमुळे तुम्हाला यश मिळाले नाही. आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांने विरोधी काम केले, तर आपले आपले काम तपासून पाहिले पाहिजे. या वेळी तरुणांनी चांगला पाठिंबा दिला आणि अल्पसंख्याकांनीही काहीही झाले तरी भाजप नको, अशी भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी शक्ती उभी केली. शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला. तरीही काही ठिकाणी आपण मागे पडलो. त्याचा विचार केला पाहिजे. तेथे आपले संघटनात्मक काम कमी पडले.

समाजातील गरीब वर्ग, नवबौद्ध वंचित आघाडीच्या मागे उभा राहिला. तर मुस्लीम समाज लोकसभेच्या निवडणुकीत वंचितच्या मागे होता, तो विधानसभेच्या वेळी राहिला नाही. इगतपुरीतील आदिवासी पाडय़ात गेलो असताना व अन्यत्र फिरताना सत्ताधाऱ्यांबद्दल जनतेमध्ये राग असल्याचे दिसून आले.

त्या सर्वाना संघटित करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे प्रयत्न आपण करायला हवेत, असे पवार यांनी सांगितले. अनुसूचित जाती-जमातींची संघटनात्मक बांधणी करण्यात आपण थोडे कमी पडलो. या समाजातील नेत्यांना पक्षात प्रतिष्ठा दिली जाते की नाही, हेही पाहिले पाहिजे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची एकच जागा मुंबईत आली आहे. आता मुंबई, ठाण्याकडे जास्त लक्ष देऊन पक्षाची ताकद उभी केली जाणार आहे.