मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या ३ किमी अंतरावरील उलवे परिसरात मांस विक्री आणि प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानतळाच्या हद्दीत होत असलेली मांस विक्री बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, याबाबत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याबाबत पुन्हा एकदा तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीला उत्तर देताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला परवाना मिळाला नसल्याने तेथे अजून हवाई वाहतुक सुरु झालेली नाही. परवाना देण्यापूर्वी विमानतळाच्या आजूबाजूला वन्यजींवाचा वावर आहे का, हे तपासले जाईल असे जीडीसीएने सांगितले.
दोन महिन्यांपूर्वी विमानविषयक नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा दावा करुन पर्यावरणप्रेमींनी ही तक्रार केली होती. मांस विक्रीमुळे परिसरात कावळे, घारी आदी पक्षी आकर्षित होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीनंतर मे महिन्यात डीजीसीएने विमानतळाच्या हद्दीत होत असलेली मांस विक्री बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही प्राण्यांची कत्तल, मांस विक्री सुरुच होते. त्यानंतर पुन्हा नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांनी यासंदर्भात प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीची देखल घेत विमानतळाला परवाना देताना विमानतळाशी संबंधित सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडल्या आहेत का, हे तापसण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एअरड्रोम ऑपरेटरकडून कारवाई सुरु असल्याचे डीजीसीएचे संचालक अमित गुप्ता यांनी सांगतिले. दरम्यान, कुमार यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे (एएआय) व्यवस्थापित एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन सर्व्हिसच्या (एआयएस) महाव्यवस्थापकांसमोर कत्तलीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
१० किमीच्या परिघात कत्तल करु नये
कोणत्याही विमानतळाच्या १० किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल करु नये असा नियम आहे. तसेच एअरड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समितीच्या (एईएमसी) नियमावलीतही विमानतळाच्या १० किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल करु नये या नियमाचा समावेश आहे. असे असतानाही नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीपासून ३ किमी अंतरावरील उलवे परिसरातील सेक्टर १९ येथे प्राण्यांची कत्तल करुन मांस विक्री केले जात आहे. यामुळे नागरी विमान वाहतूकविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला होता.
फेब्रुवारीमध्ये तक्रार
याबाबत पर्यावरणासाठी काम करणाऱ्या नॅटकनेक्ट फाउंडेशनने २४ फेब्रुवारी रोजी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन डीजीसीएच्या हवाई सुरक्षा शाखेने मार्च महिन्यात चौकशी सुरु केली होती.
कावळे, घार आदी पक्षी आकरर्षित
मांस विक्री केल्यामुळे या परिसरात कावळे, घार यांसह विविध पक्षी आकर्षित होतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधीबरोबरच इतर पक्ष्यांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे स्वच्छतेचे सर्व नियमही धाब्यावर बसवले जात आहेत.