मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या (नीट) गुणांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या दोघांना विशेष सीबीआय न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. या प्रकरणातील अन्य आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. हे जामीन नाकारण्याचे कारण असू शकत नाही, असेही न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर करताना स्पष्ट केले.
नीट युजी २०२५ च्या उमेदवारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना उत्तर पत्रिकेत फेरफार करू शकतो अशी हमी देऊन प्रत्येक उमेदवाराकडून ९० लाख रुपये उकळल्याच्या आरोपाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) १० जून रोजी संदीप शाह आणि सलीम पटेल यांना अटक केली होती. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आरोपी राजीव सिन्हा देश सोडून पळून गेला असून इतर दोघे बिहारमध्ये आहेत. अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. आजही तपास अधिकाऱ्यांकडे या आरोपींना कधी अटक होईल याबाबत ठोस उत्तर नाही. त्यामुळे इतर आरोपींना अटक झाली नाही हे अर्जादारांना जामीन नाकारण्याचे कारण असू शकत नाही, असे निरीक्षण विशेष सीबीआय न्यायाधीश व्ही.पी.देसाई यांनी दोघांना जामीन मंजूर करताना नोंदवले.
तत्पूर्वी, हे प्रकरण निव्वळ ऐकीव पुराव्यांवर आधारित आहे, असा दावा सलीम पटेल याच्यावतीने जामिनाची मागणी करताना करण्यात आला. आपण वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक सल्लागार पदावर कार्यरत आहोत. तसेच, प्रकरण भारतीय न्याय संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींमध्ये मोडत नसल्याचा दावाही पटेल याच्यावतीने केला गेला होता. प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे आपल्याला आणखी कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, असा दावा शाह याच्यावतीने जामिनाची मागणी करताना केला गेला.
दुसरीकडे, सोलापूर आणि नवी मुंबई येथील रहिवासी असलेल्या शाह आणि पटेल यांनी राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या ( एनटीए ) अस्तित्वात नसलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आणि दलाल म्हणून काम करून उमेदवारांना फसवल्याचा दावा सीबीआयने केला होता. तसेच त्यांनी तो प्रत्येक उमेदवारासाठी ९० लाख रुपये मागितले होते. वाटाघाटीनंतर ही रक्कम ८७.५ लाख रुपयांपर्यंत कमी केल्याचेही सीबीआयने म्हटले होते.