मुंबई : राज्यातील वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी(एचएसआरपी) लावण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही या योजनेकडे वाहनचालकांनी पाठ फिरवली असून आतापर्यंत फक्त ६५ लाख वाहनचालकांनी ही पाटी बसविली आहे. ग्रामीण भागात फारच अल्प प्रतिसाद मिळत आहे. कारवाई होत नसल्याने वाहन चालकही सुस्त असल्याचे निरीक्षण परिवहन विभागाने नोंदविले आहे.

राज्य सरकारने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी न बसविणाऱ्या वाहनांवर १ डिसेंबरनंतर कारवाई करण्यात येणार आहे, असे सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी सांगितले.

ग्रामीण भागात अल्प प्रतिसाद

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी मोठ्या शहरांमध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाट्या बसविण्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण राज्याच्या ग्रामीण भागात फारच अल्प प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी वाहनचालकांना नवीन पाट्या बसविण्याच्या मोहिमेची माहितीच नसल्याचे परिवहन विभागाला आढळून आले. कारवाई सुरू झाल्यास पाट्या बदलण्याची मोहीम अधिक गतिमान होऊ शकते, असेही परिवहन विभागाचे निरीक्षण आहे.