मुंबई : वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती येण्याच्या मार्गात पात्रता निकषांच्या मुद्दयमचा येणारा अडसर दूर करण्यात येणार असून पात्रतेसाठी २२ एप्रिल २०१७ ही नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे. नवी पात्रता तारीख निश्चित करण्यासाठी गृहनिर्माण विभागाने मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेपाची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीडीडी चाळ पात्रतेच्या निकषाचा फटका सुमारे तीन हजार रहिवाशांना बसत असून पात्रता निकषाच्या अटी ‘सैल’ केल्यास बीडीडीमधील तब्बल तीन हजार रहिवासी घर मिळण्यासाठी पात्र ठरणार आहेत. बीडीडी चाळीतील अनेकांनी आपली घरे वेळोवेळी हस्तांतरित केली आहेत. अनेकांनी येथील घरे विकून अथवा भाडय़ाने देऊन अन्यत्र स्थलांतर केले आहे. बीडीडी चाळीचा पुनर्विकास करताना गृहनिर्माण विभागाने २८ जून २०१७ रोजी घरांसाठी तसेच रहिवाशांसाठी पात्रता निकष जाहीर करणारा शासन आदेश जारी केला.

या शासन आदेशानुसार ज्यांच्याकडे १९९६ पूर्वीच्या रहिवासाचे पुरावे आहेत अशांनाच पात्र करण्याचे निश्चित करण्यात आले. या पात्रता निकषांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करणे बंधनकारक असून जवळपास तीन हजार रहिवाशांकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याचे अथवा त्यापैकी बहुतेकजण हे १९९६ नंतर बीडीडी चाळीत राहण्यास आल्याचे दिसून आले. यातून पुनर्विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्यामुळे या तीन हजार रहिवाशांच्या पात्रतेबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी  गृहनिर्माण विभागाने सदर प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवून दिला होता. वास्तव्याची पात्रता २२ एप्रिल २०१७ पर्यंत शिथिल करण्यात येणार आहे. हा निर्णय झाला तरी जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातील रहिवाशांनाही त्याचा फायदा द्यावा किंवा नाही हे ठरविण्यात आलेले नाही.

विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) आणि (९) या अंतर्गतही १३ जून १९९६ नंतरच्या भाडेकरूंना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. संबंधित विकासकाला अशा भाडेकरूंच्या नावे अतिरीक्त चटई क्षेत्रफळाचा लाभ उठविता येणार नाही. विकासक स्वत:च्या क्षेत्रफळातून अशा भाडेकरूंचे पुनर्वसन करू शकतो. परंतु बीडीडी चाळीसाठी १९९६ ची पात्रता शिथिल केल्यास त्याचा फायदा जुन्या इमारतींनाही लागू करण्याची मागणी पुढे येईल.

त्यामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासामध्ये वेगवेगळे पात्रता निकष जारी करणे शासनाला योग्य ठरणार नाही. न्यायालयातही आव्हान दिले जाऊ  शकते. त्यामुळे बीडीडी चाळ पात्रतेचा मुद्दा जुन्या इमारतींतील १९९६ नंतरच्या भाडेकरूंनाही लागू करावा लागणार आहे, याकडे म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New eligibility date is fixed in the bdd chawl redevelopment
First published on: 20-02-2018 at 04:23 IST