गर्दी कमी करण्यासाठी पादचारी पूल आणि स्कायवॉकची बांधणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. मेट्रो स्थानकाला जोडले गेल्यामुळे या स्थानकात दररोज होणारी प्रवाशांची गर्दी आणि त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

फलाट क्रमांक १ वर उन्नत मार्ग निर्माण करण्याबरोबर १२ मीटर रुंदीचे तीन पादचारी पूल, तसेच स्कायवॉकची बांधणी करण्याची योजना मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मदतीने रेल्वेने आखली असून त्यासाठी ५० कोटींचा खर्च येणार आहे. साधारण वर्षभरानंतर या सुविधा प्रवाशांना मिळू शकणार आहेत.

पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या मेट्रो रेल्वेमुळे प्रवाशांचा वेळ वाचत असला तरी त्यामुळे मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकात प्रचंड गर्दी होते. त्याची दखल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेतली असून रेल्वे अधिकाऱ्यांना कोंडी दूर करण्यासाठी पाहणी करण्याचे आदेश नुकतेच दिले होते.

त्यानंतर मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी घाटकोपर स्थानकाला भेट देत मेट्रो प्रशासनाला काही बदल सुचविले होते; परंतु ते पुरेसे नसल्याने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला स्थानकात प्रवासी सुविधा वाढविण्यासाठी योजना तयार करण्यास सांगितले. त्यानंतर रेल्वे विकास महामंडळाने घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या प्रवासी सुविधा वाढीचा आराखडा सादर केला असून त्यास अंतिम मंजुरी मिळण्यासाठी रेल्वेकडे पाठविण्यात आले आहे.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांची यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर १२ महिन्यांत घाटकोपर स्थानकाच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचे काम पूर्ण होईल, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. एस. खुराणा यांनी स्पष्ट केले.

उन्नत मार्गाचीही निर्मिती

घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर ७.५ मीटर रुंदीचा मेट्रो स्थानकाला आणि सर्व पादचारी पुलांना जोडणारा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. स्थानकाच्या उत्तर दिशेला असलेला ४ मीटर रुंदीचा पादचारी पूल पाडून त्या जागी दोन्ही बाजूंनी उतरणारा १२ मीटर रुंदीचा नवा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. सध्याच्या १२ मीटर रुंदीच्या मधल्या पादचारी पुलाच्या उत्तरेला आणखी एक १२ मीटरचा नवा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकाशी रेल्वे स्थानकाची स्कायवॉकने जोडणी करण्यात येईल. तसेच सध्याच्या ६ मीटर रुंदीच्या पालिका पादचारी पुलाशीही जोडणी देण्यात येईल. मेट्रो स्टेशनला जोडणी देण्यासाठी पर्याय आणि उताराची (रॅम्प)ची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New facilities at ghatkopar railway station zws
First published on: 22-11-2019 at 02:22 IST