विनोदी अभिनेता कपिल शर्माच्या एका ट्विटची दखल किरीट सोमय्यांपासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी घेतली. यावरुन काँग्रेस आमदार नितेश राणेंनी शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला आहे. कपिलच्या ट्विटची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. मीदेखील भ्रष्टाचाराविरोधात अनेकदा तक्रार केली. पण माझे कोणी ऐकले नाही अशी टीका करणारा उपहासात्मक व्हिडीओच नितेश राणे यांनी ट्विटरवर अपलोड केला आहे.

शुक्रवारी सकाळी विनोदी अभिनेता कपिल शर्माने मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी लाच मागितल्याचा आरोप करत ट्विटर बॉम्ब टाकला. या ट्विटची दखल मुंबई महापालिकेपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी घेतली. यावरुन काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी उपहासात्मक टीका केली आहे. ट्विटरवर नितेश राणे यांनी कपिल शर्माचा मुखवटा घालून एक व्हिडीओ अपलोड केला आहे.

यात नितेश राणे म्हणतात, “मी एक मुंबईकर, आज सकाळी ऐकले की असा (कपिल शर्मासारखा) चेहरा असलेल्या माणसाचे प्रश्न तुम्ही लगेच सोडवता. मीही मुंबई महापालिकेत होणारा भ्रष्टाचार, खड्ड्यावर पडलेले रस्ते, नालेसफाई, पाणीचोरी अशा असंख्य प्रश्नांबदद्दल आपल्याला पत्र लिहीलेले आहेत, निवेदन दिलेले आहेत. वारंवार मुंबई महापालिकेत फेरफटका मारत असतो. पण आजपर्यंत आमचं कोणीही ऐकलेले नाही” अशी खंत नितेश राणेंनी बोलवून दाखवली.  ”आज माझ्यावर हम भी कपिल शर्मा असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. आता तरी आमचा प्रश्न सीएमसाहेब तुम्ही ऐकाल ना” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे. एका कपिल शर्माचे म्हणणे ऐकून उपयोग नाही. मुंबईत असे अनेक कपिल शर्मा आहेत असे नितेश राणेंनी म्हटले आहे.

व्हिडीओ अपलोड करुन नितेश राणे थांबले नाहीत. त्यांनी कपिल शर्माच्या मुखवट्याचे वाटप करु असेही सांगितले आहे. तुम्हाला जर मुंबई महापालिकेविषयी तक्रार करायची असेल किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असेल. तर तुम्हाला हा मुखवटा आम्ही उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हा मुखवटा घातल्यावर तक्रारीची दखल घेतली जाईल असे त्यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे. हा प्रकार म्हणजे कॉमेडी नाईट्स विथ देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेचा दुसरा भागही असू शकेल अशी टीका त्यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविषयी अनेकदा पुरावे दिले. पण तुम्ही काय कारवाई केली असा सवालच मुंडेनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.