गोदापार्कच्या ‘राज’कारणाने भाजप अस्वस्थ

नाशिक येथे रिलायन्स फाऊंडेशनच्या मदतीने राबविण्यात येणारा गोदापार्क हा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ भाजपला अस्वस्थ करणारा ठरला आहे.

नाशिक येथे रिलायन्स फाऊंडेशनच्या मदतीने राबविण्यात येणारा गोदापार्क हा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ भाजपला अस्वस्थ करणारा ठरला आहे. निमित्त आहे, या प्रकल्पाला भाजप नेते नितीन गडकरी यांच्या उपस्थितीचे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर राज यांनी नाशिकमधूनच टीकेची तोफ डागली होती. तेव्हापासून नाशिकमध्ये भाजप व मनसेतून विस्तवही जात नसताना शनिवारी गोदापार्कच्या उद्घाटनाला गडकरी उपस्थित राहणार असल्याने हे काय नवे ‘राज’कीय नाटय़ निर्माण झाले आहे, असा सवाल भाजप नेत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
आपले लोकसभा निवडणुकीतल पत्ते उघड न करणाऱ्या राज यांनी गेल्या महिन्यात नाशिक येथे नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. यानंतर नाशिक महापालिकेतील भाजपने थेट मनसेशी काडीमोड घेण्याची तयारी दाखवली होती. तर राज्यातील बहुतेक नेत्यांनी मनसे हा विषय संपल्याचेच सांगून टाकले.
आता लोकसभा निवडणुसाठी महायुतीचे महामेळावे सुरू असतानाच भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी शनिवारी राज यांच्या संकल्पनेतील गोदापार्क प्रकल्पाच्या उद्घाटनाला हजर राहण्याचे मान्य करून भाजपला अडचणी आणले आहे. यामुळे भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असली तरी गडकरी यांच्या या ‘राजनाटय़ा’विरोधात उघडपणे बोलायला कोणीही नेते तयार नाहीत. नाशिकमधील भाजपचे कार्यकर्ते मात्र नाराज असून नरेंद्र मोदी यांच्यावर राज यांनी ज्या नाशिकमध्ये टीका केली तेथेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गडकरी यांना मनसेच्या कार्यक्रमाला यायचे कारण काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
काँग्रेस, ‘आप’चा विरोध
नाशिक महापालिकेतील सत्ताधारी मनसे व भाजपमध्ये मनोमीलन करण्यात गोदा उद्यान प्रमुख भूमिका वठविणार असला तरी या प्रकल्पास राष्ट्रवादी काँग्रेस व आम आदमी पक्षाने विरोध करण्याचे ठरविले आहे. नाशिक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रेक्षागृहातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या कामास विरोध दर्शविला. तर मखमलाबाद शिवारात गोदाकाठी होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमास आंदोलनाद्वारे विरोध केला जाणार असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nitin gadkari attend the inauguration of goda park project in nashik