केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला दिलं. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं (@ShivSena) ब्ल्यू टिक गेलं आहे आणि या हँडलवर क्लिक केलं की, सध्या रॉक अँड रोल असं नाव दिसत आहे. या हँडलला दोन लोक फॉलो करत आहेत. दुसरीकडे शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडली आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्याकडे असलेल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर मोठे बदल केले आहेत. या बदलांचा भाग म्हणून शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं नाव ShivSenaUBT_ असं ठेवण्यात आलं.

शिवसेना कम्युनिकेशन या हँडलचंही ब्ल्यू टिक गेलं असून त्या हँडलचं नाव आता ShivsenaUBTComm असं ठेवण्यात आलं आहे.

इतकंच नाही तर ठाकरे गटाने वेबसाईटबाबतही मोठा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. सध्या शिवसेनेची वेबसाईट बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गट वेबसाईटच्या नावातही बदल करणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

शिवसेनेच्या ट्विटरवरील ब्ल्यू टिक का गेलं?

ट्विटरच्या नियमांनुसार कोणत्याही हँडलला विशिष्ट तपासणीनंतर ‘व्हेरिफाईड’ केलं जातं आणि त्याचाच भाग म्हणून ब्ल्यू टिक दिलं जातं. यानंतर ट्विटर खात्याचं नाव संबंधित खातेधारकाला केव्हाही बदलता येतं. या बदलानंतर त्याचा ब्ल्यू टिकच्या स्टेटसवर काहीही परिणाम होत नाही. मात्र, व्हेरिफाईड झालेल्या आणि ब्ल्यू टिक मिळालेल्या खात्याचं ‘हँडल नेम’ बदललं, तर ट्विटर संबंधित खात्याचं ब्ल्यू टिक काढतं. त्यामुळे संबंधितांना ब्ल्यू टिक मिळवण्यासाठी पुन्हा आधीप्रमाणे अर्ज करावा लागतो.

हेही वाचा : शिवसेनेची कार्यालयं, देणग्या, संपत्ती आणि निधीवर कोणाचा अधिकार? कायदेतज्ज्ञ श्रीहरी अणे स्पष्टच म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा शिवसेना नावावरील दावा संपुष्टात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने या नावाने त्यांच्याकडे असलेल्या ट्विटर हँडलची नावं बदलून ‘शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे’ यानुसार केलं. शिवसेनेच्या हँडलमध्येच बदल झाल्याने ट्विटरच्या नियमानुसार हे ब्ल्यू टिक गेलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला ब्ल्यू टिकसाठी पुन्हा एकदा अर्ज करावा लागेल.