नवीन मोटर वाहन कायद्याची राज्यात अंमलबजावणी

मुंबई : सार्वजनिक वाहनतळांअभावी मुंबईकर आणि लगतच्या शहरांतून येणारे नागरिक आपली वाहने जागा मिळेल तिथे उभी करू लागले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याची बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या नव्या मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

आता मनाई असलेल्या ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांवर १०० रुपयांऐवजी ५०० रुपये आकारण्यात येणार आहेत. दरम्यान, जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या काळात नियम धुडकावून मनाई असलेल्या ठिकाणी उभ्या एक लाख १५ हजार २६४ वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांत दुचाकी, चार चाकीसह अन्य वाहनांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होऊ लागली. वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे वाहतूक पोलीस, आरटीओवर कामाचा प्रचंड ताण येऊ लागला आहे. वाहनतळ उपलब्ध नसलेल्या ठिकाणी, तसेच मनाई असलेल्या क्षेत्रात वाहने उभी करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. तसेच त्यावरून वादाचे प्रसंगही घडू लागले आहेत.

जुन्या इमारतींमध्ये वाहनतळाचा अभाव, इमारतीच्या आवारातील अपुरी जागा, औद्योगिक वसाहती, व्यावसायिक आस्थापनांजवळ वाहनतळांचा अभाव आदी विविध कारणांमुळे नागरिक आपली वाहने रस्त्यावर जागा मिळेल तेथे उभी करतात. वाहने उभी करण्यास मनाई असल्याचा फलक मुंबईत अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र असे असले तरीही तेथे वाहने उभी करण्यात येतात. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी जाणारे नागरिक मनाई असलेल्या ठिकाणी वाहन उभे करून निघून जातात. त्यामुळे पादचारी आणि वाहतुकीला या वाहनांमुळे अडथळा निर्माण होतो. 

मनाई असलेल्या ठिकाणी वाहन उभे केल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पूर्वी १०० रुपये दंड वसूल करण्यात येत होता. तर दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर प्रत्येक गुन्ह्य़ासाठी दीड हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. वाहतूक पोलीस किंवा आरटीओकडे पूर्वी केलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती उपलब्ध असल्यास दुसऱ्या वेळी वाहनचालक किंवा मालकाविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईत मनाई असलेल्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वाहने उभी करण्यात येतात. मात्र आता दंडाची रक्कम वाढविण्यात आल्याने अशा प्रकारांना आळा बसू शकेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अकरा महिन्यांमध्ये लाखो वाहनांवर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही वर्षांत मनाई असलेल्या ठिकाणी वाहन उभे करण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक पोलिसांनी २०१९ मध्ये अशा ठिकाणी उभ्या ३४ हजार ५४५ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच २०२० मध्ये ५० हजार १२१ प्रकरणांची नोंद झाली. तर जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ मध्ये मनाई असलेल्या ठिकाणी वाहने उभी करण्याच्या प्रकरणांमध्ये दुपटीहून अधिक वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या ११ महिन्यांमध्ये एक लाख १५ हजार २६४ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.