मुंबई : गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात परळस्थित केईम रुग्णालय जलमय झाल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले. तथापि, हे वृत्त पूर्णपणे दिशाभूल करणारे होते आणि २६ मे रोजी रुग्णालयात ही स्थिती अजिबात नव्हती, असा दावा रुग्णालय प्रशासनाने सोमवारी उच्च न्यायालयात केला. पावसाचे पाणी रुग्णालयात शिरले नव्हते, तर तळमजल्याजवळील मोकळ्या जागेत साचले होते. त्याचप्रमाणे, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर साचलेल्या पाण्याचा निचरा झाला, असा दावा देखील रुग्णालय प्रशासनातर्फे केला गेला.

मुंबईत २६ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे केईएम रुग्णालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. रुग्णालयातही गुडघाभर पाणी साचल्याने रुग्ण सेवेवर परिणाम झाला. या घटनेची छायाचित्रे पाहिल्यानंतर उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली होती. तसेच, रुग्णालय जलमय झालेच कसे ? रुग्णालयात पाणी शिरलेच कसे ? अशी प्रश्नांची सरबत्ती करून रुग्णालयाची तातडीने पाहणी करण्याचे आणि भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले होते.

या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी, महापालिकेच्या वतीने वकील अक्षय शिंदे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीत रावत यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात उपरोक्त दावा करण्यात आला. तथापि, भविष्यात अशाप्रकारे रुग्णालयत परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घेतली जाईल व त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असा दावाही महापालिका आणि रुग्णालय प्रशासनाने केला.

प्रतिज्ञापत्रात नेमके काय ?

गेल्या २६ मे रोजी मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस पडला. ही परिस्थिती दिवसभर कायम होती. तथापि, रुग्णालय सखल भागात असल्यामुळे मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे रुग्णालयाच्या तळमजल्याच्या आवारात पाणी शिरले. परंतु, पाणी साचलेल्या भागात रुग्णांसाठीचे प्रतीक्षा कक्ष नव्हते किंवा तेथे रुग्णांवर कोणतेही उपचार सुरू नव्हते. किंबहुना, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पाणी उपसा करणाऱ्या अतिरिक्त पंपामार्फत साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा केला, असा दावा रुग्णालय प्रशासनाने प्रतिज्ञापत्रात केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णांवर उपचार करणाऱ्या विभागांत गुडघाभर पाणी साचल्याचे वृत्त पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि त्या दिवशीच्या घटनास्थळाच्या परिस्थितीच्या विरुद्ध होते, असेही रावत यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले. रुग्णालयातील रेडिओलॉजी, एमआरआय आणि एक्स-रे कक्षासारख्या महत्त्वाच्या रुग्ण सेवा कक्षांवर पावसाचा परिणाम झाला नाही. याउलट, २६ मे रोजी १९ एमआरआय, १२० सीटी स्कॅन आणि २७० एक्स-रे काढण्यात आले. थोडक्यात, रुग्णालयाचे कामकाज कोणत्याही व्यत्ययाशिवाय अविरत सुरू राहिले, असा दावाही रावत यांनी केला.