मुंबई : रविवारी तळकोकणात आलेल्या पावसाने विक्रमी वेगाने प्रवास करत सोमवारी मुंबई गाठली आणि पहिल्याच पावसात महापालिका, सरकारी यंत्रणांसह मुंबईकरांची दाणादाण उडविली. पहाटेपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस दुपारी भरती येईपर्यंत कायम होता. परिणामी हिंदमाता, अंधेरी सब-वे, मिलन सब-वे या जलकोंडी होणाऱ्या नेहमीच्या ठिकाणांबरोबरच कधी नव्हे ते देशाचे आर्थिक केंद्र असलेली दक्षिण मुंबई जलमय झाली. मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या ‘मेट्रो-३’च्या भूमिगत स्थानकांमध्ये पाणी भरल्याने मार्ग बंद करणे भाग पडले. एकीकडे मुंबईची ‘बुड बुड नगरी’ होत असताना मोठमोठे दावे करणाऱ्या यंत्रणा मात्र ‘मी खीर खाल्ली नाही’ असे सांगत एकमेकांकडे बोट दाखविण्यात मश्गुल होत्या.
रविवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर आणखी वाढला. हळूहळू मुंबईतील सखलभाग जलमय होऊ लागले. पूर्व आणि पश्चिम उपनगरांसह शहरांतील सखल भाग आणि रेल्वे मार्गावर पाणी साचू लागले आणि वाहतूक मंदावली. परिणामी कार्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागली. लोकल विलंबाने धावत होत्या, तर रस्त्यांवर कूर्मगतीने वाहतूक सुरू होती.
दुसरीकडे कधी नव्हे ते दक्षिण मुंबईमधील कुलाबा, नरिमन पॉइंट, मंत्रालय, ओव्हर मैदान, चर्चगेट, सीएसएमटी या भागात पाणी साचू लागले. दररोज लाखो प्रवाशांची ये-जा सुरू असलेल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरच पाणी साचले होते. महापालिका मुख्यालयासमोरच पाणी साचल्याबद्दल मुंबईकरांमधून आश्चर्यमिश्रित संताप व्यक्त करण्यात येत होता. मंत्रालयाच्या परिसरातही पाणी साचल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. शेअर बाजार, चर्चगेट-सीएसएमटी स्थानके, बड्या कंपन्यांची मुख्यालये असलेले टोलेजंग इमारतींमुळे कायमच आकर्षण स्थान असलेला नरिमन पॉइंट परिसर काही काळ पावसाच्या पाण्याखाली गेल्याने यंत्रणांच्या कामाचा पुरता बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील सखल भागही जलमय झाले आणि मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे सखल भागात दरवर्षी पावसाचे पाणी साचते. त्यावर उपाययोजना म्हणून महापालिकेने आतापर्यंत ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. तसेच सूक्ष्म नियोजनांतर्गत दरवर्षी विविध ठिकाणच्या पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याचेही काम करण्यात येते. असे असतानाही पाणी साचण्याची ठिकाणे कमी झालेली नाहीतच, उलट त्यात भरच पडली आहे.
गेल्या काही वर्षांत पूरमुक्त केलेल्या ग्रॅंटरोड नानाचौक, हिंदमाता या भागांतही यंदा पुन्हा पाणी साचले. हिंदमाता येथे भूमिगत टाक्यांचा प्रयोग करण्यात आला आहे. या कामासाठी पालिकेने सुमारे २०० कोटी खर्च केले. हिंदमाता उड्डाणपुलाखाली लघू उंदचन केंद्र बांधून पाणी पंपाद्वारे वाहून नेण्यात येते व प्रमोद महाजन कला पार्क येथे बांधलेल्या साठवण टाकीत साठवले जाते. मडके बुवा चौक येथे साचणारे पाणी पंपाद्वारे सेंट झेविअर मैदानातील टाकीत साठवले जाते. त्याकरीता १२०० व १६०० मिमी व्यासाच्या पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. असे असतानाही या भागात गुडघाभर पाणी साचले होते.
कुलाब्यात २० वर्षांनी पूर
कुलाबा परिसरात २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर प्रथमच पाणी भरल्याचे सांगितले जात आहे. सोमाणी मार्ग आणि ब्लू बर्ड हॉटेलजवळील लेनसह अनेक भागात गेल्या काही वर्षांत कधीही पाणी साचले नव्हते. ससून डॉक प्रवेशद्वार २ जवळ अजिंठा ओशन व्ह्यूच्या बाहेरही पाणी साचले होते. यामुळे महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांची पुरती पोलखोल झाली.
विभाग कार्यालय जलमय
ग्रॅन्ट रोडमधील नानाचौक हा सखलभाग असून तो एकेकाळी पाणी साचण्यासाठी प्रसिद्ध होता. गेल्या काही वर्षांपासून पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे या भागात पाणी साचत नव्हते. सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसात नानाचौकापासून थेट ताडदेवपर्यंतचा भाग पाण्याखाली गेला. विशेष म्हणजे, नानाचौकातील मुंबई महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाचा परिसरही जलमय झाला.