इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता
मुंबई : उत्तर मुंबईतील मालाड परिसरात येत्या काही वर्षांत एकाच वेळी अनेक विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. कांदळवने, वनजमिनींवर ही विकासकामे होतील. या सर्व कामांसाठी केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या परवानग्यांची आवश्यकता आहे. या सगळ्या विकासकामांचा एकसंघपणे विचार करता पर्यावरणाच्या दृष्टीने ती परवडणारी आहेत का, त्यामुळे नागरिकांना खरेच फायदा होणार की फक्त पर्यावरणाचा ऱ्हास होणार याचाही विचार करावा लागणार आहे.
मुंबईतील आणि विशेषत: पश्चिम उपनगरातील लोकसंख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातही मालाड परिसरात लोकसंख्या वाढीचे प्रमाण प्रचंड आहे. या परिसरात अनधिकृत झोपडपट्ट्या, रिक्षांची बेसुमार वर्दळ, अनधिकृत बांधकामे यांची गर्दी आहे. येत्या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, धुळीचा सामना नागरिकांना करावा लागेल.
आणखी वाचा- आमचा प्रश्न – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : प्रदूषण, आरोग्याचे प्रश्न मार्गी लागावे
येथील पर्यावरणाचा ऱ्हास हा कळीचा मुद्दा ठरावा. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर कांदळवने कापली जातील. ती आधीपासूनच कापली जात आहेत. वनजमिनीचाही वापर केला जाईल. एकेका प्रकल्पासाठी परवानगी घेतली जात असली तरी अजून काही वर्षांनी हे प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा त्याचे सार्वत्रिक मोठे दुष्परिणामही दिसून येतील.
दोन समुद्रकिनाऱ्यांना जोडण्यासाठी पूल, मार्वे व मनोरी या दोन सुमद्रकिनाऱ्यांना जोडणारा पूल, अंधेरी – मालाड लगून रोडपर्यंत एक उन्नत मार्ग तयार केला जाणार आहे. मनोरीमध्ये समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा प्रकल्प उभारला जाईल. गोरेगाव मुलुंड मार्गाचे काम सुरू आहे. वर्सोवा – दहिसर जोड रस्त्यासाठी चारकोप – मालाड माइंडस्पेस मालाडपर्यंत समांतर बोगदा बांधण्यात येणार आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे एक केंद्रही उभारण्यात येईल.
आणखी वाचा-झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
सोय आणि नुकसानही
मढ-वर्सोवा पुलामुळे या दोन समुद्रकिनाऱ्यांना जोडणारा थेट मार्ग उपलब्ध होऊ शकेल. सध्या थेट मार्ग नसल्यामुळे २२ किलोमीटरचा वळसा घालून वा मग बोटीने प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात बोटसेवा बंद ठेवावी लागत असल्याने अडचणींत अधिकच भर पडते. नवी पूल झाल्यास दळणवळण सोपे होईल. मात्र, येथील निसर्गाची हानी होण्याची भीती आहे. मार्वे आणि मनोरी सुमद्रकिनाऱ्यांना जोडणारा पूल बांधण्यात येणार असल्यामुळे या ठिकाणी मासेमारी करणाऱ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर त्याचा परिणाम होईल.