मुंबई: खासगी व्यावसायिक तंत्रशिक्षण संस्थांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी घेतलेला प्रवेश हा अंतिम मुदतीनंतर रद्द केल्यास शुल्कापोटी भरण्यात आलेली अनामत रक्कम वगळता उर्वरित रकमेवर पाणी सोडावे लागणार आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला घेतलेला प्रवेश रद्द करण्यासाठी आता महाविद्यालयांत खेटे घालावे लागणार नाहीत. प्रवेश ऑनलाईन रद्द करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र अंतिम मुदतीनंतर प्रवेश रद्द करायचा झाल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जावे लागणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात जाहीर केलेल्या अधिसूचनेत प्रवेश रद्द करण्यासंदर्भातील नियम जाहीर केला आहे. त्यात यापुढे विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही, तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रवेश रद्द करण्यासंदर्भात विनंती केल्यानंतर अर्जाची प्रत संस्थेला सादर केले नसेल तरीही केलेली विनंती अंतिम समजण्यात येणार आहे. अशा प्रकारे प्रवेश रद्द केल्यावर उमेदवार त्या जागेवरील हक्क गमावेल आणि अशी जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल. विद्यार्थ्याने प्रवेश रद्द करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी किंवा त्या दिनांकास प्रवेश रद्द केला असेल आणि प्रणालीद्वारे निर्मित अर्जाची स्वाक्षरी प्रत संस्थेला सादर केल्याच्या दोन दिवसांच्या आत प्रक्रिया शुल्क म्हणून एक हजार रुपये वजा करून उर्वरित शुल्काचा पूर्ण परतावा आणि त्याची मूळ कागदपत्रे महाविद्यालयाकडून त्याला परत करण्यात येतील.
विद्यार्थ्याने सक्षम प्राधिकाऱ्याने ठरवलेल्या प्रवेशाच्या अंतिम तारखेनंतर प्रवेश रद्द करण्यासाठी अर्ज केल्यास संबंधित विद्यार्थ्याला प्रतिपूर्ती ठेव व अनामत ठेव याव्यतिरिक्त कोणतेही शुल्क परत मिळणार नाही. तसेच अंतिम दिनांकानंतर प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश रद्द करण्याची लिंक निष्क्रिय करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्या गुणवत्ता यादी दिनांकानंतर उमेदवारास संस्थेतील प्रवेश रद्द करण्यासाठी संस्थेकडे अर्ज सादर करावा लागणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.