मुंबई : मुंबईत सध्या चार मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल असून या मार्गिकांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुकर होणार आहे. आता एकाच तिकीटावरून चारही मट्रो मार्गिकांमधून प्रवास करता येणार आहे. घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १ चे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘वन तिकीट’ ॲप कार्यान्वित केले आहे.
प्रवाशांना एका वेळी दोन वा त्यापेक्षा अधिक मार्गिकांवरून प्रवास करायचा असल्यास त्यांना या ॲपवरून एकच तिकीट खरेदी करता येणार आहे. येत्या काळात आणखी काही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार असून या मार्गिकांवरून प्रवास करण्यासाठी या ॲपवर तिकीट उपलब्ध होणार आहे.
मेट्रो १ सह दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ, दहिसर – गुंदवली मेट्रो ७ आणि आरे – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक भुयारी मेट्रो ४ या चार मेट्रो मार्गिका सेवेत दाखल आहेत. दरवर्षी किमान ५० किमीची मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिले आहे. त्यामुळे सध्या वाहतूक सेवेत असलेले ७० किमीचे मेट्रोचे जाळे येत्या काही वर्षातच २७० किमी आणि पुढे ३३७ किमीवर पोहचणार आहे.
प्रत्येक मेट्रो मार्गिका नजीकच्या दुसऱ्या मेट्रो मार्गिकेशी जोडली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात एका मार्गिकेवरून दुसऱ्या मार्गिकेचा वापर करून प्रवाशांना इच्छितस्थळ गाठाता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी, त्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी तिकीट सोप्या पद्धतीने उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन एमएमओसीएलने स्वीक्वेलस्ट्रिंग कंपनी आणि एमएमओसीएलने वनतिकिट ॲप कार्यान्वित केले आहे.
ओएनडीसी (ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स) या नेटवर्कवर हे ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. या मेट्रो ३ चे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) जून २०२५ मध्ये मेट्रो ३ साठी हे ॲप कार्यान्वित केले असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एमएमओसीएलने या ॲपची सुधारित आवृत्ती आता कार्यान्वित केली आहे.
प्रवाशांना प्ले स्टोअरवर वन तिकीट ॲप उपलब्ध करून घेता येईल. पुढील प्रक्रिया पूर्ण करून ॲपचा वापर करता येणार आहे. हे ॲप वापरण्यास अत्यंत सोपे असून या ॲपवरून जवळचे मेट्रो स्थानक गुगलद्वारे अपोआप निवडले जाते. तर दुसरीकडे या ॲपमुळे विविध मार्गिकांवरून प्रवास करण्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळे तिकीट खरेदी करावे लागत नाही. त्यामुळे हे ॲप प्रवाशांच्या पसंतीस उतरेल आणि त्यांचा मेट्रो प्रवास सुकर करेल, असा दावा एमएमओसीएलकडून करण्यात आला आहे.